‘सीसीटीव्ही’चा प्रस्ताव धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:46 AM2018-03-16T00:46:36+5:302018-03-16T00:46:36+5:30
शहरात अवैध वाहतूक व चोरीचे वाढते प्रमाण तसेच मोटारसायकल व अन्य अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
ऑनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : शहरात अवैध वाहतूक व चोरीचे वाढते प्रमाण तसेच मोटारसायकल व अन्य अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
दोन वर्षांपूर्वी २५ सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्याची घोषणा करण्यात आली. परिणामी शहरातील चोऱ्यांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली. पण, हा प्रस्ताव प्रत्यक्षात कृतीत उतरला नाही. चोऱ्यांचे प्रमाण सतत वाढत आहेत. मोटारसायकल चोरुन नेण्याचे प्रमाणही वाढल्याने पोलीस हैराण झाले. पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी शोध मोहीम राबवून काही चोरट्यांना जेरेबंद केले होते. पण, पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज आहे. ब्रह्मपुरी शहराच्या चौकात व मुख्य रस्त्यांच्या बाजूला काही युवक विनाकारण उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. शाळा- महाविद्यालयात जाताना विद्यार्थिंनींना अपशब्दांचा मारा सहन करावा लागतो. त्यामुळे या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भुरट्या चोरऱ्यांचे प्रमाण वाढल्याने विविध वॉर्डांतील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकार तातडीने बंद झाला नाही, तर भविष्यात मोठ्या घटना घडू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच नगर परिषदने सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी शहरातील नागरिक व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे.
नगर परिषदेने तातडीने पुढाकार घ्यावा
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक मदत घेवून संभाव्य संकटांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वर्दळीचे चौक
ख्रिस्तानंद, शिवाजी चौक, सावरकर चौक, बसस्थानक रेल्वेस्टेशन, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, झाशी राणी चौक, जुनी आनंद टॉकीज, उराडे पेट्रोल पंप चौक, टिळक नगर, कुर्झा कॉर्नर आणि स्टेट बँक चौकात कॅमेºयांची आवश्यकता आहे.