सीडीसीसी बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅॅक; साडेतीन कोटी उडविले

By परिमल डोहणे | Updated: February 12, 2025 23:08 IST2025-02-12T23:08:09+5:302025-02-12T23:08:52+5:30

दिल्ली व नोएडाच्या बँक खात्यात केले वळते...

CDCC Bank's online system hacked; Rs 3 crores 50 lakh stolen | सीडीसीसी बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅॅक; साडेतीन कोटी उडविले

सीडीसीसी बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅॅक; साडेतीन कोटी उडविले

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनएएफटी व आरटीजीएस करण्याची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बँक व्यवस्थापकांनी याबाबतची तक्रार रामनगर व सायबर पोलिस ठाण्यात केली आहे. जिल्ह्यात असा प्रकार पहिलाच असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विस्तार जिल्हाभरात झाला आहे. येथील खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही बँक एका शासकीय बँकेशी लिंकअप आहे. त्याद्वारे ऑनलाइन व्यवहार केले जातात. या बँकेतून दररोज आरटीजीएस व एनएएफटी केली जाते. दरम्यान, ७ फेब्रुवारी व १० फेब्रुवारीला अज्ञाताने आरटीजीएस व एनएएफटीची करण्याची ऑनलाइन प्रक्रियाच हॅक करून तेथून सर्व रक्कम दिल्ली व नोएडा येथील बँक खात्यावर वळती केली. ही बाब समोर येताच बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली. दरम्यान, व्यवस्थापकांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

३३ ट्रान्झेक्शन फ्रीझ
रामनगर व सायबर पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल होताच चंद्रपूर सायबर पोलिसांनी ३३ ट्रॉन्झेक्शन फ्रीझ करून ६० लाख ६४ हजार ५८२ रुपये परत जमा केले, तर ७१ लाख ३४ हजार ७३७ रुपये विविध बँक खात्याच्या अकाउंटला होल्ड झाले आहेत. सायबर पोलिसांच्या तत्काळ ॲक्शनने एक कोटी ३१ लाख ९९ हजार ३१९ रुपये वाचविण्यास यश आले आहे.

बँकेने गठित केले दहा चमू
सायबर चोरट्यांकडून पुन्हा असा प्रकार घडू नये, या अनुषंगाने बँक व्यवस्थापकांनी दहा वेगवेगळ्या चमूंचे गठन केले आहे. हे सर्व चमू नजर ठेवून आहेत. कोणत्याही खातेदाराच्या खात्यातून पैसे गेले नाही. त्यामुळे खातेदारांनी घाबरू नये, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी केले आहे.

Web Title: CDCC Bank's online system hacked; Rs 3 crores 50 lakh stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.