केंद्रीय चमूने तपासली चंद्रपूरची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 12:38 AM2017-01-12T00:38:15+5:302017-01-12T00:38:15+5:30
एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे स्वच्छतेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून मानांकन केले जाणार आहे.
केंद्राच्या निर्देशानुसार काम : दिल्लीला पाठविले छायाचित्र
चंद्रपूर : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे स्वच्छतेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून मानांकन केले जाणार आहे. या अंतर्गत केंद्रातील एका तीन सदस्यीय चमूने बुधवारी चंद्रपुरात येऊन स्वच्छतेची पाहणी केली. शहरातील हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, रुग्णालय व रस्त्यांचे गोपनीय पध्दतीने निरीक्षण केले.
दिल्ली येथील ही चमू मंगळवारी सायंकाळीच चंद्रपुरात पोहचल्याची माहिती आहे. या चमुत विक्रांत भोसले, प्रणय पटेल व चेतन चोरडिया यांचा समावेश आहे. ही चमू आपले स्वतंत्र वाहन घेऊन आले होते. त्यात अत्याधुनिक दूरसंचार सेवाही उपलब्ध होती. या चमूने आज सकाळी मनपा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी शहराची गोपनीय पध्दतीने पाहणी करणे सुरू केले. विविध ठिकाणावरील फोटो तत्काळ दिल्लीला पाठविण्यात येत होते. या चमूने शहरातील बसस्थानक, तुकूम येथील मातोश्री मंगल कार्यालय, दाताळा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती, झरपट नदी परिसर, चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन, शहरातील काही शौचालये व रुग्णालयात भेट देऊन तेथील स्वच्छता न्याहाळली. या संदर्भात मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याश संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की ही चमू केंद्राच्या निर्देशानुसार काम करीत आहे. त्यांचे काम स्वतंत्र रुपात सुरू असून यात मनपा प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. मनपा प्रशासनाने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा कसोशिने प्रयत्न चालविला आहे. पूर्वीपेक्षा आता शहर अधिक सुंदर होत आहे, असे सांगत चमूच्या कार्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)