चंद्रपूर, नागपूरसह परराज्यांत चेन स्नॅचिंग करणाऱ्यास वर्धा येथून अटक

By परिमल डोहणे | Published: April 24, 2023 10:49 PM2023-04-24T22:49:02+5:302023-04-24T22:49:24+5:30

विविध ठिकाणी आहेत १६ गुन्हे दाखल : एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त 

Chain snatcher in other states including Chandrapur, Nagpur arrested from Wardha | चंद्रपूर, नागपूरसह परराज्यांत चेन स्नॅचिंग करणाऱ्यास वर्धा येथून अटक

चंद्रपूर, नागपूरसह परराज्यांत चेन स्नॅचिंग करणाऱ्यास वर्धा येथून अटक

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर, नागपूरसह परराज्यांत घरफोडी व चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस वर्धा येथील एका वसाहतीमधून चंद्रपूर रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन असा एकूण एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सूरज शेट्टी (कोरवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अधिक चौकशीत त्याच्यावर तेलंगना, आंध्रप्रदेश येथे १६ गुन्हे घरफोडीचे तर नागपूर, आदिलाबाद येथे चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

चंद्रपूर शहरातील गुलमोहर काॅलनी निवासी नीलम देशपांडे १ एप्रिलच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान मोपेडने घरी जात होत्या. गुलमोहर कॉलनीच्या टर्निंगवर एका पांढऱ्या रंगाच्या मोटारसायकल चालकाने मागून २० हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम सोन्याची चेन पळवली तर २ एप्रिलला सिस्टर कॉलनी येथे सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान रंजना वैद्य फिरण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या मोटारसायकल चालकाने मागून येऊन मंगळसुत्र पळविले, अशी तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे रामनगर येथील गुन्हे शोध पथक, डीबी पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून परिसरात चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेरे बघितले. यावेळी मोटारसायकल व आरोपीची ओळख पटली. दरम्यान रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे यांनी सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार यांचे वेगवेगळे तीन पथक तयार केले.

तपासाअंती तो वर्धा येथे दडून बसल्याचे समोर आले. पोलिसांनी वर्धा गाठून त्याला अटक करत त्याच्याकडून एक लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तो चंद्रपूरसह नागपूर, तेलंगणा आंध्रप्रदेश येथेही घरफोडी व चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, एसडीपीओ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजेश मुळे, ठाणेदार लता वाढीवे, एपीआय हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, नापोशी विनोद यादव आदींनी केली.
बॉक्स

असा लावला चोरट्याचा शोध
पोलिसांचे पथक दररोज चंद्रपूर शहरातील सहा ते आठ दिवस सकाळी ४ ते ६ दरम्यान चंद्रपूर शहरात प्रवेश करणारे मार्ग रहमतनगर तसेच पठाणपुरा येथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. १४ एप्रिलला पहाटेदरम्यान संशयित मोटारसायकल घेऊन एक हेल्मेटधारी इसम पठाणपुराकडून चंद्रपूरमध्ये प्रवेश करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. एपीआय हर्षल एकरे यांनी त्याचा पाठलाग करत चारचाकी वाहनाने मोटारसायकलला ठोस मारली तरीही तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. जंगलात त्याने आपले कपडे काढून ठेवले होते. पोलिसांनी माहितीवरून आंध्रप्रदेश, तेलंगणा येथे त्याच्या शोधार्थ चमू रवाना केली तेव्हा तो वर्धा येथे दडून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वर्धा गाठून शांतीनगर वसाहतीत त्याला अटक केली.

Web Title: Chain snatcher in other states including Chandrapur, Nagpur arrested from Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.