चैतन्य कायम पण आनंद हरविला..
By admin | Published: September 26, 2015 12:54 AM2015-09-26T00:54:53+5:302015-09-26T00:54:53+5:30
चंद्रपुरातील गणपतीच्या आगमनाएवढेच पूर्वी विसर्जनाच्या मिरवणुकीचेही आकर्षण असायचे.
गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
चंद्रपुरातील गणपतीच्या आगमनाएवढेच पूर्वी विसर्जनाच्या मिरवणुकीचेही आकर्षण असायचे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा म्हणजे अनेकांसाठी पर्वणी असायची. अख्खे चंद्रपूर त्या काळात रस्त्यावर यायचे. रस्तावर पाय ठेवायलाही जागा नसायची. तरीही सर्व काही निर्विघ्नपणे पार पडायचे. भांडण नाही, तंटा नाही की कसलीही कुरकूर नाही. रात्रभर ढोल-ताशांचा गजर आसमंत निनादून सोडायचा. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणताना भक्तगणांच्या मनात बाप्पाला निरोप देताना गलबलून यायचे. त्या काळात आजच्या सारखे कर्णकर्कश डिजे नव्हते. मोठाले बँडबाजेही नव्हते. डफडे, सनई, ताशे, भजन, दिंड्या, लेझीम पथके हेच मुख्य आकर्षण असायचे. आखाड्यातील मल्ल आणि पहेलवानांच्या कसरती व कर्तबगारीने गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला वेगळाच रंग चढायचा. गतकाळात मिळालेले सत्काराचे फेटे मल्लांच्या डोईवर चढायचे, उस्तादांच्या गळ्यात फुलांच्या माळा पडायच्या आणि त्यांच्या पायांना वंदन करून पठ्ठे (शिष्य) आखाड्याच्या रणात आपल्या कर्तबगारी दाखवायचे. डोळ्याचे पात लावते न लावते तो डोक्यावरचे लिंबू धारदार तलवारीने कापलेले पहाताना काळजात थर्रर्र्र व्हायचे. दांडटपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठीचे खेळ पाहून मनात स्फुरण चढायचे. ते मर्दानी खेळ बघून आपोआपच अनेकांची पाऊले सरावासाठी आखाड्याकडे वळायची.
आज काळ बदललायं. डिजेशिवाय गणेश मंडळांचे आणि भक्तांचे भागतच नाही. क्विंटल, अर्धा क्विंटल गुलाल किमान प्रत्येक मोठ्या मंडळांकडून उधळलाच जातो. प्रबोधनाने केव्हाचीच माघार घेतली. निव्वळ मनोरंजन आणि बडेजावपणात हल्ली गणेश मंडळांची स्पर्धा लागल्याने मुळ गाभा मात्र हरविला.
फार लांब नाही, २०-२२ वर्षापूर्वीच्या भूतकाळात डोकावून पाहीले तरी चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, मूलमधील गौरवशाली गणेशोत्सवाचे संदर्भ सापडतील. चंद्रपुरात आणि वरोऱ्यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तींचे साकारलेले वेगळेपण आणि महागौरीच्या विसर्जनानंतर साकारले जाणारे देखावे हा औत्सुक्याचा विषय असायचा. पुढच्या वर्षी काय देखावा करायचा याचे नियोजन वर्षभर चालायचे, तेसुद्धा गुप्तपणे. या मंडळातील हालचालीची खबरबात त्या मंडळाला नसायची. देखावे खुले झाले की कुण्या मंडळाचा देखावा किती जबरदस्त आहे, याच्या चर्चा चालायच्या. बक्षिसे दिली जायची. कलावंतांना सन्मान मिळायचा. अख्खे शहर कलावंतांचा, मूर्तीकाराचा आदर करायचे. प्रत्येक मंडळातील मूर्तीचेही वेगळेपण असायचे. नारळ, गारगोट्या, धान्य, कंचे, बदाम, लाडू अशा वस्तू वापरून त्या काळातही इको फे्रंडली बाप्पा गावात अवतरायचे. मूर्तींचे रंगही नैसर्गिक असतं. नानाविध संकल्पनातून मूर्ती आकाराला यायच्या. तिकीट लावून मूर्ती आणि देखावे पहाण्याची संधी असायची. माणसंही सहकुटूंब तिकीट काढून आणि रांगा लावून या पर्वणीचा आनंद घ्यायचे. गणेशोत्सवात लक्की ड्रॉ सुद्धा असायचा. ९९ पैशाच्या पावतीवर सायकल, टेपरेकॉर्डरसारखे मोठे बक्षिस मिळायचे. ड्रॉमध्ये कुणाला काय मिळते, याची उत्सुकता असायची. गणेशोत्सवाच्या काळात कापडी पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपट हा खुप मोठ्ठा आनंदाचा विषय असायचा. धार्मिक चित्रपटांची रेलचेल असायची. कोणते मंडळ अधिक चित्रपट दाखविते यावर त्या मंडळाची ‘श्रीमंती’ ठरविली जायची. पुढे ही जागा व्हिडीओवरच्या चित्रपटांनी घेतली. हल्ली मोबाईल टीव्हीच्या जमान्यात हा आनंद कुठल्याकुठे लुप्त झालायं. आरतीसाठी अख्खा वॉर्ड गोळा व्हायचा. प्रसादासाठी झुंबड उडायची.
कलावंतानाही या उत्सवात सुगीचे दिवस असायचे. नकलाकार, जादूगार, नाटक कंपन्या, गायक, भजन मंडळांच्या तारखा आधीच बूक करून ठेवाव्या लागायच्या. आॅक्रेस्ट्रालाही त्या काळात मोठी प्रतिष्ठा होती. गणरायाचे आगमन म्हणजे चैतन्याचा झरा असायचा.
विसर्जनाचा दिवस हा मुख्य सोहळा असायचा. या मिरवणुकीत मंडळांनी साकारलेले देखावे म्हणजे भन्नाट कल्पना असायच्या. एकाहून एक सरस देखावे रस्त्यावर उतरायचे. त्याच्या चर्चा पुढे वर्षभर रंगायच्या. देखाव्याच्या तयारीसाठी मंडळातील कार्यकर्ते महिनेमहिने राबायचे. त्यासाठी येणारा खर्चही प्रचंड असायचा. मात्र आनंदापुढे आणि चंद्रपुरातील दातृत्वामुळे या खर्चाचे टेन्शन कुणालाच नसायचे. रात्रभर मिरवणुका चालायच्या. बेफामपणे वाद्ये वाजायची मात्र त्रास झाल्याची तक्रार कुणाचीच नसायची. पोलिसांवरही आजच्यासारखा ताण नसायचा. ते सुध्दा मिरवणुकात आनंदाने नाचायचे.चंद्रपुरात रामाळा तलावावर आणि वरोऱ्यात तलावावर सर्व मूर्तीचे विसर्जन व्हायचे. फेरीवाले, दुकानदार, हॉटेल, पानठेले यांच्यासाठी ही मोठी संधी असायची. आखाड्यातील पठ्ठे रस्त्यांवर लाठ्याकाठ्या खेळायचे. आगीची प्रात्यक्षिके व्हायची. खऱ्याखुऱ्या तलवारी आणि दांडपट्टेही भर रस्त्यावर फिरायचे. पण कसली भीती! ना कसली दहशत!
आता काळ बदलला. त्या सोनेरी दिवसातील आनंद पर्वणीही केव्हाच बदलली. भक्तांच्या मानसिकतेसोबत सरकारी कायदे आणि नियमही बदलले. उत्सवाला वेळचे बंधन आले. आवाजावर नियंत्रण आले. आखाड्यातील शस्त्र केव्हाचीच म्यान झालीत. एक जीवंत इतिहास डोळ्यादेखत काळाच्या उदरात गडप झाला. या चाकोरीत आताही गणेशोत्सव होतो. मिरवणुकाही निघतातच. लक्षावधी रूपये उधळले जातात. पण तेव्हाची मजा आज उरली नाही, याचे शल्य मात्र मिरवणुकांच्या दिवसात साऱ्यांनाच अस्वस्थ करून जाते.