आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ओबीसींचे चंद्रपुरात चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 06:24 PM2022-03-07T18:24:41+5:302022-03-07T18:28:50+5:30
ओबीसींची जातनिहाय जनगणना, आरक्षण व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सोमवारी चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर : अनेक वर्षांपासून ओबीसीच्या मागण्या व समस्या प्रलंबित आहेत. केंद्र सरकार अन्याय करीत असून आरक्षण कमी करण्याचा घाट घातला. जातनिहाय जनगणना नाकारून अधिकारांपासून वंचित ठेवले. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासाठी आवाज उठवावा, असे आवाहन ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले. आज दुपारी १२ वाजता स्थानिक वरोरा नाका चौकात झालेल्या ओबीसी चक्का जाम आंदोलनात ते बोलत होते.
डॉ. जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते. यावेळी, ओबीसी समाजाची जातनिहाश जनगणना करावी, स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे. ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉरलशिप द्यावी. मॅट्रिकपूर्व स्काॅरलशिप दिली नाही. राज्य सरकारने वर्ग ३ व ४ पदभरती करावी, बिगर आदिवासी वनपट्ट्यासाठी तीन पिढ्यांची रद्द करावी. केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे. एससी व एसटी शेतकऱ्यांप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शासकीय योजना सुरू कराव्या. केंद्र सरकारने क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठविण्यात आले.
२३ मार्चला दिल्लीत जंतरमंतर
२३ मार्च २०२२ रोजी न्यू दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील ओबीसी समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासचिव सचिन राजुरकर यांनी केले.