स्वतंत्र विदर्भासाठी जिल्हाभरात चक्काजाम
By admin | Published: January 12, 2017 12:33 AM2017-01-12T00:33:19+5:302017-01-12T00:33:19+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी जिल्हाभर चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बारा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन : तीन हजार कार्यकर्त्यांना अटक तर काहींना केले स्थानबद्ध
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी जिल्हाभर चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बुधवारी सकाळी ११ वाजतापासून जिल्ह्यातील प्रमुख बारा ठिकाणी करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो नागरिकांचा सहभाग होता. पोलिसांनी जिल्हाभरात तीन हजार आंदोलनकर्त्यांना अटक केली तर काहींना स्थानबद्ध केले.
राजुरा येथील बसस्थानक समोरील चौकात दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-हैद्राबाद हा महामार्ग रोखुन धरला. यामुळे दोन्ही बाजुंनी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या. दीड तासानंतर पोलिसांनी उपस्थित पाचशे कार्यकर्त्यांना अटक केली आणि पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेले. येथील आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. अॅड. वामनराव चटप, अॅड. अरुण धोटे, अॅड. श्रीनिवास मुसळे, प्राचार्य अनिल ठाकुरवार, अॅड. राजेंद्र जेनेकर, शेषराव बोंडे आदींनी केले. चंद्रपूर येथे नागपूर मार्गावरील पडोली फाटा येथे किशोर पोतनवार, प्रा. एस.टी. चिकटे, अशोक मुसळे, हिराचंद्र बोरकुटे, मितीन भागवत यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन झाले. येथील शंभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
कोरपना येथील आदिलाबाद मार्गावर चारशे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यांना पोलिसांनी अटक केली. येथे आंदोलनाचे नेतृत्व अरुण नवले, प्रभाकर दिवे, निळकंठ कोरांगे, रवी गोखरे, प्रल्हाद पवार, मदन सातपुते, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे, अनंता गोढे आदींनी केले. गोंडपिपरी येथील पंचायत समिती चौकात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात २०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील नेतृत्व तुकेश वानोडे, अरूण वासलवार, भारत खामनकर आदींनी केले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
वरोरा येथील आनंदवन चौकात नागपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता तीनशे विदर्भवाद्यांना अटक करण्यात येवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अॅड. शरद कारेकर, बाबुराव नन्नावरे, सुधाकर जिवतोडे, छोटुभाऊ शेख आदींनी केले. मूल येथील गांधी चौकात रास्ता रोको करणाऱ्या अडीचशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेले. येथील नेतृत्व कवडु येनप्रेडीवार, विवेक मांदाडे, अशोक मारगोनवार, बंडु वानखेडे, ओमदेव मोहुर्ले, नितेश येनप्रेडीवार यांनी केले. नागपूर मार्गावरील टेमुर्डा फाटा येथे रास्ता रोको करणाऱ्या शंभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. येथे बाबुराव नन्नावरे, सुरेंद्र देठे, ईश्वर पावडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद चौकात अॅड. गोविंद भेंडारकर, प्रेमलाल मेश्राम, सुधीर शेलकर, प्रा. हरिश्चंद्र चोरे, अशोक रामटेके, अरविंद नागोसे, सुधाताई राऊत यांच्या नेतृत्वात रास्ता रोकोचे आंदोलन झाले. येथे तीनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर-चिमूर राज्य महामार्गावर चिमूर येथे तीनशे कार्यकर्त्यांना अटक झाली. नागभीड येथे अमृत शेंडे, मानिक जांभुळे, सचिन पंचभाई, वसंता रासेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. भद्रावती व पोंभुर्णा येथेही आंदोलन झाले. (स्थानिक प्रतिनिधी)
आंदोलनाशिवाय पर्याय नाही -वामनराव चटप
आता विदर्भावरील अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी राजुरा येथील आंदोलनादरम्यान बोलताना केले. विधानसभेचे माजी उपसभापती अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी संयुक्त महाराष्ट्रात बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे. तरूणांनी आपल्या भविष्यासाठी पुढे येण्याचे आवाहन वरोरा येथील आनंदवन चौकात बोलताना केले.