गतिरोधक नसल्याने अपघात होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:53+5:302021-07-25T04:23:53+5:30
गडचांदूर : बसस्थानकावरील रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील काळात बांधकाम करण्यात आलेल्या शहरातील राजुरा ...
गडचांदूर : बसस्थानकावरील रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील काळात बांधकाम करण्यात आलेल्या शहरातील राजुरा ते कोरपना जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक करणे आवश्यक होते; परंतु ते करण्यात आले नाही. रस्त्याच्या बाजूला अनेक दुकाने असून, बसस्थानक हे वर्दळीचे ठिकाण आहे. परिसरात सिमेंटचे मोठे कारखाने असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असते. पावसाळा सुरू असल्यामुळे काही वाहनांचा ब्रेकसुद्धा लागत नसतो. बाजूला एस.टी. बसचा थांबासुद्धा आहे. भरधाव येणारी जड वाहने सुसाट येत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून रस्त्याच्या दुतर्फा गतिरोधक असणे आवश्यक आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच गतिरोधकाचे बांधकाम होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.