वरोरा तालुक्यात यंदा चंदनाची शेती
By Admin | Published: June 11, 2016 12:54 AM2016-06-11T00:54:47+5:302016-06-11T00:54:47+5:30
महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ दिसणारे व बाजारात मोठी मागणी व किमत असलेल्या चंदन वनस्पतीची शेती वरोरा
वरोरा : महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ दिसणारे व बाजारात मोठी मागणी व किमत असलेल्या चंदन वनस्पतीची शेती वरोरा तालुक्यातील एक शेतकरी यावर्षी प्रथमच करणार आहे. याकरिता शेतकऱ्याने कृषी विभागाकडे अर्ज दाखल केला आहे.
वरोरा तालुक्यातील चारगाव (बु) येथील अल्प भुधारक शेतकरी तथा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी मधुकर भलमे यांनी यावर्षी दोन एकर शेतात चंदनाची झाडे लावण्याकरिता कृषी विभागाकडे अर्ज सादर केला असून चंदनाची झाडे लावण्याकरिता शेत सज्ज करणे सुरू केले आहे. दोन एकरामध्ये ६०० चंदनाच्या झाडांची लागवड केली जाणार असून चंदनाचे झाड परावलंबी असल्याने चंदनाच्या झाडाची लागवड करण्याकरिता शासनाने आयुष अंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून योजना यावर्षी प्रथमच जाहीर केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याकरिता शेतकरी गट तयार करून चंदनाच्या झाडाची लागवड केली जाणार असून याला अनुदान दिले जाणार आहे. यासोबतच चंदनाची रोपे, लागवड व घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. चंदनाचे झाड पूर्ण विकसित होण्याकरिता १५ वर्षाचा कालावधी लागतो. या पंधरा वर्षात दरवर्षी शेतकऱ्यांना आंतर पिक घेत आर्थिक फायदा करून घेता येतो, असे मानले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)