रस्त्याअभावी चांदगाववासी भोगतात मरणयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:42 PM2017-11-12T23:42:43+5:302017-11-12T23:43:03+5:30
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून चांदगाव रस्त्यालगत गेल्या २० ते २५ वर्षांपासून नवीन वस्ती वसलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून चांदगाव रस्त्यालगत गेल्या २० ते २५ वर्षांपासून नवीन वस्ती वसलेली आहे. या वस्तीतील रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत असल्याने व रस्त्यावर झुडपाने अतिक्रमण केल्याने येथील शेकडो नागरिकांना मरणयातना भोगून जीवन जगावे लागत आहे.
राजस्थानी भवन परिसरात भरगच्च वसाहत वसलेली आहे. या वसाहतीत जवळून मुख्य विद्युत वाहक तारा जमिनीवर लोंबकळल्या आहेत. त्यामुळे परिसरातील खेळणारी मुले व मोठी वाहने तारांच्या संपर्कात येतील, असा धोका आहे. या परिसरातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून तारा ताठ करण्याची मागणी करीत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
तसेच या परिसरात मोठे झाडे खुप प्रमाणात रस्त्यावर झुकलेले असून ते कोणत्याही क्षणी विद्युत खांबाच्या तारावर कोसळून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. परंतु, या गंभीर बाबीकडे वारंवार निवेदने, तोंडी तक्रार देऊनही कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांत रोष पसरला आहे. तर दुसरीकडे ये-जा करणाºया रस्त्यावर मोठमोठी झुडपांचा त्रास वाढल्याने रस्ता पायवाट स्वरूपाचा बनला आहे. त्यामुळे महिलांना व बालकांना सायंकाळी ये-जा करणे धोक्याचे असते.
यासंदर्भात येथील नागरिकांनी यापूर्वी वारंवार वीज कंपनी व नगर परिषद ब्रह्मपुरी यांना निवेदन देऊन मागणी केली. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.