चंद्रपुरात काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:08 PM2018-12-07T23:08:07+5:302018-12-07T23:08:23+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील या कारभाराविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील या कारभाराविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, नगरसेविका सुनिता लोढीया, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. मलक शाकीर, देवराव पाटील धोटे, महिला शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, असंघटित कामगार विभाग जिल्हा सरचिटणीस हरिदास लांडे, फारुक सिद्दीकी, शालिनी भगत, वंदना भागवत, बळीराज धोटे, संजय बुटले, शंकर बावणे, दीपक कटकोजवार यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मागील सहा महिन्यापासून रुग्णालयात दीडशेहून अधिक नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? रुग्णांना मोफत औषधी मिळत नाही. हफकीन नावाची कंपनी मर्यादा संपलेल्या औषधीचा पुरवठा करीत आहे. एका बेडवर दोन ते तीन रुग्ण ठेवण्यात येत आहे. डॉ. बी. डी. नाखले हे अधीक्षक आहे, मात्र ते कायमस्वरूपी नाही. कंत्राटी कामगारांना मागील सहा महिन्यापासून वेतन नाही. आयसीयूमध्ये अव्यवस्था आहे. डॉक्टर पुरेसे नाही. पुरेसा स्टाफ नाही. यासारख्या अनेक समस्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. शस्त्रक्रियेची सामुग्री निकृष्ट दर्जाची आहे. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्या सोडवाव्या व नागरिकांना योग्य आरोग्य सेवा पुरवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वरील सर्व समस्या दूर न झाल्यास शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रुग्णालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.