८५ वर्षीय आजोबांचा अनोखा विक्रम; पाण्यात ३७ प्रकारचे योग, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 11:45 AM2022-08-29T11:45:46+5:302022-08-29T11:53:06+5:30
एकूण ३७ प्रकारचे योग त्यांनी एका तासाच्या कालावधीत पाण्यात उपस्थितांसमोर करून दाखविले.
चंद्रपूर : मनात ठाणलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही याची प्रचिती या आजोबांकडे पाहून येईल. त्यांनी जलतरण तलावात एक-दोन नव्हे तर ३७ प्रकारचे योग प्रकार एका तासाच्या कालावधीत करून दाखवले. त्यांच्या या अनोख्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् करण्यात आली आहे.
८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरे यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंदविले गेले. रविवारी इंडिया बुक ऑफ रेकार्डने पाण्यातील योगासाठी त्यांची चंद्रपूर येथे येऊन नोंद घेतली. जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावामध्ये २४ प्रकारची योग प्रात्यक्षिके करून दाखविली. याशिवाय १३ प्रकारचे पाण्यातील विविध पोहण्याचे प्रकार करून दाखविले.
एकूण ३७ प्रकारचे योग त्यांनी एका तासाच्या कालावधीत पाण्यात उपस्थितांसमोर करून दाखविले. त्यांचे ८० वर्षांच्या पुढील लोकांच्या पाण्यातील योगाच्या सर्वांत जास्त कवायती यासंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नाव नोंदविले गेले. कार्यक्रमामध्ये कृष्णराव नागपुरे गुरुजी यांचा इंडिया बुक ऑफ रेकार्डतर्फे पदक, प्रमाणपत्र आणि टेन देऊन गौरव करण्यात आला. संचालन श्रीहरी शेंडे, आभार सुवर्णा नागपुरे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.