कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती निवडणूक जाहीर

By साईनाथ कुचनकार | Updated: January 14, 2024 15:11 IST2024-01-14T15:10:31+5:302024-01-14T15:11:38+5:30

२४ला निवडणूक : इच्छुकांनी लावली फिल्डिंग.

chandrapur agriculture produce market committee vice chairman election announced | कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती निवडणूक जाहीर

कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती निवडणूक जाहीर

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदासाठी २४ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. यामध्ये पारस पिंपळकर आणि सुनील फरकाडे या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अठरा सदस्यीय या बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसच्या एका गटाची युती आहे. काँग्रेसचे गंगाधर वैद्य सभापती तर उपसभापती भाजपचे गोविंदा पोडे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, उपसभापती पोडे यांचे काही दिवसांपूर्वी अकाली निधन झाले. त्यामुळे उपसभापतीची जागा रिक्त आहे. या रिक्त झालेल्या पदासाठी २४ जानेवारी रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. दरम्यान, यासाठी कोठारीचे सुनील फरकाडे आणि धानोराचे पारस पिंपळकर यांच्या नावाची उपसभापतिपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. पिंपळकर ग्रामपंचायत गटातून सर्वाधिक मताने कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून गेले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे निकटवर्तीय आहे. सुनील फरकाडे यांची संचालकपदाची ही दुसरी वेळ आहे. तेही ग्रामपंचायत गटातून निवडून आले आहेत. या व्यक्तिरिक्त अनिल मोरे यांच्याही नावाची चर्चा आहे.

असे आहेत संचालक...

१८ संचालक असलेल्या बाजार समितीत भाजप-काँग्रेसचे ११ व दिनेश चोखारे गटाचे (काँग्रेस) ६ संचालक आहेत. त्यामुळे सभापती काँग्रेस व उपसभापती भाजपाच्या वाट्याला आले. आता सत्ताधारी पक्षाकडे अकरा सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सध्यातरी उपसभापतिपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असेल कार्यक्रम..

२४ जानेवारी रोजी १२:३० ते १ वाजेपर्यंत संचालकांच्या उपस्थितीबाबत स्वाक्षरी, त्यानंतर नामनिर्देशन वाटप, पत्र स्वीकारने, छाननी, वैध नामनिर्देशन पत्राची छाननी, मतदान घेणे, मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: chandrapur agriculture produce market committee vice chairman election announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.