प्रशासनाचा करंटेपणा; चंद्रपुरातील पुरातन विहिरी गडप होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 10:11 AM2022-04-12T10:11:41+5:302022-04-12T10:16:01+5:30

चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

chandrapur ancient wells on the verge of extinction due to government negligence | प्रशासनाचा करंटेपणा; चंद्रपुरातील पुरातन विहिरी गडप होण्याच्या मार्गावर

प्रशासनाचा करंटेपणा; चंद्रपुरातील पुरातन विहिरी गडप होण्याच्या मार्गावर

googlenewsNext
ठळक मुद्देगोंडकालीन जलनितीपासून घेतला नाही धडा

राजेश मडावी

चंद्रपूर : चंद्रपुरातील गोंडराजांनी स्वतंत्र जलधोरण तयार करून अनेक तलाव व विहिरी खोदल्या. परंतु, सद्यस्थिती उपयोगी येऊ शकतील अशा चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात पायऱ्या असलेल्या अनेक ऐतिहासिक विहिरी आजही सुस्थितीत आहेत. चंद्रपुरातील बाबूपेठ येथील आणि पोंभुर्णा येथे राजराजेश्वर मंदिर परिसरात पायऱ्या असलेली विहीर अत्यंत नावीण्यपूर्ण आहे. या विहिरींचे स्थापत्यशास्त्र समजून घेण्यासाठी राज्यभरातील अभ्यास येतात. आहे. काही विहिरींत खाली उतरून पाणी पिण्यासाठी पायऱ्या आहेत. जिल्ह्यात २५ पेक्षा अधिक विहिरी अशंत: चांगल्या अवस्थेत आहेत. परंतु, प्रशासनाचे असेच दुर्लक्ष राहिल्यास त्या लवकरच गडप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बहुतांश विहिरींचे गुगल मॅपिंग

बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २० पुरातन विहिरींचे गुगल मॅपिंग केले. आता या विहिरी जगाच्या नकाशावर आल्या. कुणालाही या विहिरी गुगलच्या माध्यमातून बघता येतात. दुर्लक्षित चिमूर तालुक्यातील दोन विहिरीही गुगलवर आल्या आहेत.

कुठे आहेत पुरातन विहिरी ?

चंद्रपूर, भद्रावती, नागभीड, चिमूर, नागभीड, राजुरा, गोंडपिपरी, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यात पुरातन विहिरी आहेत. यातील बहुतांश विहिरी वस्तीच्या मध्यभागी आहेत. परंतु, काही बुजल्या तर काही विहिरींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने खचल्या आहेत.

वरपांगी योजनांवर कोट्यवधींची उधळण

चंद्रपूर मनपा व जिल्हा प्रशासनाने प्राचीन विहिरींच्या संवर्धनासाठी काहीच पाऊल उचलले नाही. पाणी पुरवठ्याच्या वरपांगी योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च होतो. परंतु, पुरातन विहिरींना काहीच महत्त्व नाही, असा निष्कर्ष काढून उपेक्षा सुरू केली जात आहे.

बाबूपेठात तीन मजली पायऱ्यांची विहीर

चंद्रपुरातील इको प्रो संस्थेने बाबूपेठ सोनामाता परिसरातील ६० फुट खोल गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहीर स्वच्छ केली. ही दुर्लक्षित विहीर सुमारे तीन मजली पायऱ्यांची आहे. इकाे प्रोने उत्साह दाखविताच मनपा माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी पुढे आली. मात्र, विहिरीच्या दीर्घकालीन सुरक्षेसाठी आर्थिक तरतूदच केली नाही.

चंद्रपुरातील पुरातन विहिरींचे एक वेगळेच स्थापत्यशास्त्र आहे. ते आधुनिक स्थापत्यशास्त्राला थक्क करेल, असे आहे. या विहिरी इतिहास म्हणून सुरक्षित ठेवायची स्थळे आहेतच. मात्र, प्रशासनाने त्या दैनंदिन वापरात आणण्यास सक्षम केल्या पाहिजे.

-डॉ. योगेश दुधपचारे, जलव्यवस्थापन अभ्यासक, चंद्रपूर

पुरातन विहिरींचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी जागृती व स्वच्छता मोहीम राबवितो. आधीच्या पूर्वजांनी पिण्याच्या पाण्यासाठी इतकी चांगली सुविधा तयार करून ठेवली. त्यामुळे प्रशासनाने ठोस धोरण तयार करून विहिरींचे संर्वधन करावे.

-बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो, चंद्रपूर

Web Title: chandrapur ancient wells on the verge of extinction due to government negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.