‘आज आनंदी आनंद झाला’, वयोवृद्ध महिलांनी केली एकच धमाल
By साईनाथ कुचनकार | Published: October 12, 2023 06:08 PM2023-10-12T18:08:12+5:302023-10-12T18:08:58+5:30
चंद्रपूर आझाद गार्डन हास्य क्लब वर्धापन दिन : ७० ते ८२ वर्षांच्या महिलांनीही सादर केले नृत्य
चंद्रपूर : वय वाढले तरी मनाची आणि स्वत:ची तयारी असेल तर सर्व काही शक्य आहे. असाच प्रयत्न चंद्रपूर येथील आझाद गार्डन हास्य क्लबच्या २२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात अगदी ७० ते ८२ वर्षाच्या ज्येष्ठ महिलांनी करून दाखविला. नृत्य, एकांकीका, नाटिका असे अनेक कार्यक्रम सादर करीत दाद मिळविली. एवढेच नाही तर ‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला’ या गाण्यावरही त्यांनी बहारदार ग्रुप डान्स करून एकच धमाल केली.
मागील २२ वर्षांपासून येथील आझाद गार्डनमध्ये हास्यक्लब चालविला जातो. या क्लबचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठांसह येथील सदस्यांनी सहभाग घेतला. गायन, नृत्य, कविता वाचन, अभिनय असा विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्लबचे संस्थापक अध्यक्ष कलमसिंह कछवाह यांनी यासाठी ज्येष्ठांना प्रोत्साहन दिले.
‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला’ या गाण्यावर ७० ते ८२ वयोगटामध्ये असलेल्या आशा ठाकरे, शुभांगिनी किटे, विना भुसारी, कल्पना दंतुलवार, बांगडे, मंगरुळकर यांनी ग्रुप डान्स सादर केला. अगदी तरुणांना लाजवेल असा डान्स करीत या ज्येष्ठ महिलांनी एकच धमाल केली. विविध स्पर्धांमध्ये सहभागी सदस्यांना बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले.