१८ महिन्यात चंद्रपूर बसस्थानक सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:49 PM2018-01-27T23:49:43+5:302018-01-27T23:50:06+5:30
सन २०१५ चा अर्थसंकल्प सादर करताना एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा अर्थमंत्री म्हणून आपण केली होती.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सन २०१५ चा अर्थसंकल्प सादर करताना एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा अर्थमंत्री म्हणून आपण केली होती. या घोषणेला अनुसरून चंद्रपुरातील मुख्य बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या कामाचे भूमिपूजन पाच सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या हस्ते करताना आनंद होत आहे. चंद्रपुरातील बसस्थानक आधुनिक स्वरूपात १८ महिन्यांच्या कालावधीत नागरिकांच्या सेवेत रूजु होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर येथील मुख्य बस स्थानकाच्या आधुनिकीकरण व नुतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पाच सेवानिव़ृत्त एसटी कर्मचाºयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, एसटीचे विभाग नियंत्रक कार्तीक सहारे, विभागीय अभियंता राहुल मोडकवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर आणि मूल या बसस्थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे. यापुढील काळात पोंभुर्णा, नागभीड, चिमूर, गोंडपिपरी, कोरपना, घुग्गुससह सर्वच ठिकाणची बसस्थानके देखणी होतील. बसेसच्या खरेदीसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. नव्या बसेसमधील १० टक्के बसगाड्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देण्याबाबत आपण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केली आहे, असे सांगितले.
यावेळी एसटी कर्मचारी संघटना, बसस्टॅन्ड कर्मचारी संघटना, आॅटोरिक्षा संघटना, ग्रामीण पत्रकार संघ आदी संघटनांनी ना. मुनगंटीवार यांचा सत्कार केला. तर स्वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरलाल लांजेवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विभाग नियंत्रक कार्तिक सहारे यांनी केले. संचालन शीतल गौड यांनी तर आभार विभागीय अभियंता राहुल मोडकवार यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
मूल बसस्थानकाचे भूमिपूजन
मूल : १० कोटींचा निधी खर्च करून मूल येथे सुशोभित बसस्थानक साकार होणार आहे. बस स्थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरण कामाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. संजय धोटे, नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, न. प. उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्याधिकारी सरनाईक, विभाग नियंत्रक कार्तिक सहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक सहारे यांनी केले. संचालन प्रवीण मोहुर्ले तर आभार राहुल मोडक यांनी मानले.