छत्तीसगड राज्यातील वाघाच्या शिकारीचे चंद्रपूर कनेक्शन; अटकेतील आरोपीशी भ्रमणध्वनीवर संवाद
By राजेश भोजेकर | Published: July 11, 2023 10:04 AM2023-07-11T10:04:01+5:302023-07-11T10:04:21+5:30
छत्तीसगढ राज्यातील पथक गोंडपिपरीत दाखल
चंद्रपूर : देशातील १३ व्याघ्र प्रकल्पांना सीबीआयकडून धोक्याचा इशारा देण्यात आला. यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याचा समावेश आहे. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने देखील इशारा दिल्यानंतर चंद्रपूरचा मध्यचांदा वनविभाग सतर्क झाला आहे. त्याचवेळी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलात दि.६ जुलैला वाघाची शिकार प्रकरण उघडकीस आहे. त्यासंदर्भात बिजापूर (छत्तीसगड) येथील पथकाने सालेकसा व आमगाव येथील ११ जणांना तर वाघाची कातडी, नखे, हाडे, आणि मिशीचे केस घेणाऱ्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील सीआरएफ कर्मचाऱ्यासह २० जणांना अटक केली.
दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील घटनेनंतर संशयितांचे अटकसत्र सुरू होताच चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग व पोलीस विभागाने सुद्धा चौकशीला सुरुवात केली. वाघाची शिकार संदर्भात अटकेत असणाऱ्या आरोपीशी वाघाच्या शिकार व अवयव तस्करीप्रकरणी भ्रमणध्वनीवर संबंध जुळल्याने गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील ट्रॅक्टर चालक धर्मराव चापले वय (४२) याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी छत्तीसगढ येथील पथक रवाना झाले.
छत्तीसगडच्या एसीपींचा चंद्रपूच्या एसपीशी संपर्क
आंतराज्यीय वाघाच्या शिकार प्रकरणी वनविभागाने पोलीस विभागाची मदत घेतली. छत्तीसगडच्या एसीपींनी चंद्रपूरचे एसपी रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय धर्मराज पटले यांनी आरोपी चापले याला अटक केली.