चंद्रपुरातील गुन्हे अन्वेषण विभागाचा कारभार नागपुरातून !
By Admin | Published: July 9, 2014 11:21 PM2014-07-09T23:21:40+5:302014-07-09T23:21:40+5:30
महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या तपासामध्ये मोलाची भूमिका बजाविणाऱ्या चंद्रपुरातील गुन्हे अन्वेषण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. केवळ दोन हवालदारांच्या बळावर सुरू असलेल्या चंद्रपुरातील
डीवायएसपी नाही : पोलीस निरीक्षकाचेही पद रिक्तच
चंद्रपूर : महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या तपासामध्ये मोलाची भूमिका बजाविणाऱ्या चंद्रपुरातील गुन्हे अन्वेषण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. केवळ दोन हवालदारांच्या बळावर सुरू असलेल्या चंद्रपुरातील या कार्यालयाचा कारभार अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे नागपुरातून चालविला जात आहे.
चंद्रपुरातील सीआयडी क्राईम अर्थात गुन्हे अन्वेषण विभागात चार पदे आहेत. यात डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक प्रत्येकी एक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. असे असले तरी सध्या फक्त दोन हवालदार कार्यरत आहेत. येथील डिवायएसपी जी.आर. आढाव यांची बदली ३१ मे रोजी ठाणे ग्रामीणला झाली. तेव्हापासून नवीन अधिकारी मिळालाच नाही. अन्य अधिकाऱ्याकडेही या पदाचा चार्ज दिलेला नाही. त्यामुळे नागपुरातील सीआयडी क्राईमच्या मुख्यालयातून सध्या चंद्रपूरचा कारभार चालविला जात आहे.
पोलीस निरीक्षकाचे पद तर गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहे. कुणी अधिकारी यायला तयार नाही. त्यामुळे कामाची सर्व धुरा दोन हवालदारांवर आली आहे.
अलिकडच्या काळात ब्रम्हपुरीतील दुहेरी हत्याकांडाचा तपास करून प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचविण्याची भूमिका या विभागाने पार पाडली होती. सध्या अधिकारीच नसल्याने केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम तेवढे सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)