चंद्रपूरच्या दिग्दर्शकाचा ‘पल्याड’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात; फोर्ब्स मॅगझिननेही घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 12:22 PM2022-10-28T12:22:56+5:302022-10-28T12:25:06+5:30
संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका व आजूबाजूच्या गावांत २५ दिवसांत पूर्ण झाले आहे.
चंद्रपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त ‘पल्याड’ या मराठी चित्रपटाची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने निवड केलेल्या पाच चित्रपटांत निवड झाली होती. आता गोव्यात होणाऱ्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पल्याड’ पाेहोचणार आहे. अमेरिकेच्या जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिननेही या चित्रपटाची दखल घेतली आहे.
स्पेनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कमी बजेटमध्ये तयार केलेल्या या चित्रपटासाठी दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांना बेस्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथे झालेला १२ वा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल आणि मुंबई येथे झालेल्या ७ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनासाठी त्यांना प्रथम पदार्पणाचा पुरस्कार प्राप्त झाला. चित्रपटाला आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १८ पुरस्कार मिळाले. पल्याड चित्रपटाची निर्मिती चंद्रपूर येथील निर्माते पवन सादमवार, सूरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्यप्रिया आर्टसच्या बॅनर अंतर्गत केली.
संपूर्ण चित्रीकरण चंद्रपुरात
शशांक शेंडे आणि देविका दफ्तरदार या प्रसिद्ध कलावंतांसोबत बल्लारपूर येथील बालकलाकार रुचित निनावे तसेच नागपूरचे देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, चंद्रपूरचे भारत रंगारी, बबिता उइके, सायली देठे, रवी धकाते, सुमेधा श्रीरामे, राजू आवळे आणि मुंबईतील अभिनेते गजेश कांबळे आदींच्या यात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांची असून पटकथा व संवादलेखन सुदर्शन खडांगळे, शैलेश दुपारे यांनी केले आहे. संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका व आजूबाजूच्या गावांत २५ दिवसांत पूर्ण झाले आहे.