चंद्रपूर जिल्ह्यात १७० नव्या मतदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:29 PM2018-05-07T23:29:25+5:302018-05-07T23:29:25+5:30

राज्याच्या ज्येष्ठ सभागृहातील सदस्याचा कार्यकाल संपत असल्याने चंद्रपूर - वर्धा - गडचिरोली या विधान परिषद क्षेत्राची निवडणूक येत्या २१ मे ला होत आहे.

In Chandrapur district, 170 voters will be filled | चंद्रपूर जिल्ह्यात १७० नव्या मतदारांची भर

चंद्रपूर जिल्ह्यात १७० नव्या मतदारांची भर

googlenewsNext
ठळक मुद्देविधानपरिषद निवडणूक : जिल्ह्यात तीन नगर परिषद व सहा नगरपंचायतीची निर्मिती

राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : राज्याच्या ज्येष्ठ सभागृहातील सदस्याचा कार्यकाल संपत असल्याने चंद्रपूर - वर्धा - गडचिरोली या विधान परिषद क्षेत्राची निवडणूक येत्या २१ मे ला होत आहे. या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यातील एक हजार ५९ मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील तीन नगर परिषद व सहा नगरपंचायतीची नव्याने निर्मिती झाल्याने या विधान परिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात १७० मतदारांची नव्याने भर पडली आहे.
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या तीन जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मिळून बनलेल्या या मतदार संघ निवडणुकीत एक हजार ५९ मतदार आहेत. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या निवडणुकीत मतदार म्हणून जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगर परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व नगरपंचायत सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागच्या निवडणुकीत नगर पंचायत अस्तित्वात नव्हत्या. त्या ग्रामपंचायती होत्या. शासनाच्या नव्या धोरणानुसार तालुका स्तरावरील शहरांना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे अशा नव्याने अस्तित्वात आलेल्या तिन्ही जिल्ह्यात नगरपंचायतीची संख्या बरीच आहे. या नगर पंचायतीच्या सदस्यांना प्रथमच विधान परिषद सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदाराची संख्या वाढली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षात चिमूर, गडचांदूर व नागभीड या नगर परिषदांची नव्याने निर्मिती करण्यात आली तर जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली व सिंदेवाही या सहा शहरांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. या नव्याने निर्मित झालेल्या नगर परिषदांमध्ये ५८ मतदार तर सहा नगरपांयतीमध्ये ११२ मतदार असे एकूण १७० मतदार चंद्रपूर जिल्ह्यात वाढले आहेत. ते प्रथमच विधान परिषद आमदारांना मतदार करणार आहेत. अशाचप्रकारे वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा नगर पंचायतींची नव्याने निर्मिती झाली असल्याने त्या जिल्ह्यातही मतदार संख्या वाढली आहे. मतदार संख्या वाढल्याने उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. घोडे बाजार झाल्यास अर्थकारणही चांगलेच तापणार आहे. नव्याने मतदार झालेल्या सदस्यांना चालून आलेल्या संधीचे सोने करण्याचे डोहाळे लागले आहेत. अर्थकारणावर भर देऊन तशाच चर्चा सध्या जोर घरू लागल्या आहेत. या नव्या सदस्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी फिल्डिंग सुरू आहे.

असे आहेत नवे मतदार
चिमूर नगर परिषद- मतदार संख्या-१९
गडचांदूर नगर परिषद - मतदार संख्या - १९
नागभीड नगर परिषद - मतदार संख्या - २०
सिंदेवाही नगरपंचायत - मतदार संख्या -१९
सावली नगर पंचायत - मतदार संख्या -१९
गोंडपिपरी नगर पंचायत - मतदार संख्या -१७
पोंभूर्णा नगर पंचायत- मतदार संख्या - १९
कोरपना नगर पंचायत - मतदार संख्या - १९
जिवती नगर पंचायत - मतदार संख्या - १९

Web Title: In Chandrapur district, 170 voters will be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.