चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ४४२ विद्यार्थी दहावीत नापास, १ हजार ८३५ विद्यार्थी अगदी काठावर उत्तीर्ण
By साईनाथ कुचनकार | Published: June 2, 2023 06:17 PM2023-06-02T18:17:02+5:302023-06-02T18:17:28+5:30
५ हजारांवर विद्यार्थ्यांनी मिळविले प्रावीण्य
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल २ हजार ४४२ विद्यार्थी नापास झाले आहेत. यामध्ये ७६० मुली, तर १ हजार ६८२ मुलांचा समावेश आहे. १ हजार ८३५ विद्यार्थी अगदी काठावर उत्तीर्ण झाले असून, ५ हजार २७७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले आहे. १० हजार ४१८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली असून, ७ हजार ९५१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूर विभागात चंद्रपूर पाचव्या क्रमांकावर
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर गेला आहे. मागील वर्षी जिल्हा चौथ्या क्रमांकावर होता. यावर्षी जिल्ह्याचा निकाल विभागात पुन्हा घसरला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळेचा ९५ टक्के निकाल निकाल लागला आहे. यावर्षी ९१.२५ टक्के जिल्ह्याचा निकाल लागला.