चंद्रपूर जिल्ह्यात सहा महिन्यात ५ हजार ३७७ व्यक्तींना मोकाट कुत्र्यांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:11 PM2020-09-29T22:11:06+5:302020-09-29T22:13:39+5:30
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जानेवारी ते जुलै २०२० पर्यंत १४ शहरांमध्ये तब्बल ५ हजार ३७७ व्यक्तींना कुत्र्यांनी चावला घेतला आहे.
राजेश मडावी
चंद्रपूर : आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जानेवारी ते जुलै २०२० पर्यंत १४ शहरांमध्ये तब्बल ५ हजार ३७७ व्यक्तींना कुत्र्यांनी चावला घेतला आहे. सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. कुत्र्यापासूनही रेबिज हा अत्यंत घातक विषाणूजन्य आजार उद्भवतो. त्यामुळे श्वानप्रेमींनो जरा सावध असे म्हणायची वेळ आली आहे.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज आजाराचा प्रादुर्भाव होतो. रेबिज लस व इम्नुनोग्लोब्युलीन उपलब्ध असूनही उपचाराअभावी मृत्यूच्या घटना घडू शकतात. त्यामुळे या आजारावर १०० टक्के नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आले नाही. याच कारणांमुळे २०३० पर्यंत रेबीज आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट सरकारने पुढे ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक प्राणी आरोग्य संघटना आणि अन्न व कृषी संघटनांनी रेबिजचा समावेश वन हेल्थ कन्सेप्ट मध्ये समावेश केल्याची माहिती सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. व्यंकटराव घोरपडे यांनी दिली. चंद्रपूर शहरात जुलै २०२० पर्यंत १ हजार ७९२, बल्लारपूर तालुक्यात ५४८, वरोरा ५९३, मूल २६४ जणांना कुत्र्याने चावा घेतला. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सावलीचा (८५) अपवाद वगळल्यास उर्वरित सर्वच ठिकाणी १५० ते २५० व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला आहे.
बाह्यरूग्ण विभागात सर्वाधिक नोंद
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, तसेच उपजिल्हा रूग्ण, ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात जुलै २०२० पर्यंत ५ हजार ३७७ व्यक्तींवर उपचार करण्यात आला. आंतररूग्ण विभागात १७ व्यक्तींवर उपचार करण्यात आला. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लगेच प्रतिबंधात्मक उपचार मिळाल्याने जिल्ह्यातील मृत्यूवर नियंत्रण मिळाले आहे.
रेबिजची लक्षणे
पिसाळलेले कुत्रे, इतर बाधित जनावराने चावा घेतल्यास दोन महिने रेबिज आजाराची लक्षणे दिसू लागतात. चावलेली जागा व प्रत्यक्ष किती विषाणूंची संख्या जखमेतून शरिरात गेली. यावर आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी अवलंबून आहे. आठवड्यापासून एक वर्षापर्यंत असू शकतो. काही ठिकाणी दोन-तीन वर्ष लागू शकतात. चावलेल्या जागेतून हे विषाणू मज्जातंतूच्या साह्याने मेंदूकडे जातात. डोकेदुखी व ताप येतो. स्नायंूचा लकवा, पॅरॅलिसिसमुळे पाणी पिणे, बोलण्यास अडथळा निर्माण होतो. पाण्याची भीती वाटते. त्यामुळे या रोगाला हायड्रोफोबिया म्हणतात. आजारामुळे आवाज स्पष्ट निघत नाही. आवाजातील बदलामुळे ओरडणे विचित्र वाटते. मेंदूला सूज येऊन रक्त जमा होते. हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो.
शेतकऱ्यांनी सावध असावे
जनावरांना कुत्रे चावल्यासउत्साहित होऊन धावतात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात. डोळ्यांमध्ये रितेपण जाणवते. शेतकऱ्याला ओळखत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. अशी लक्षणे दिसल्यास तातडीने पशुवैद्यक अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला पाहिजे.
स्वराज्य संस्थांची उदासिनता
शहरातील मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनीआहे. मात्र, निधी नसल्याचे कारण पुढे करून टाळले जाते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना दर महिन्याला वाढत आहेत. शहरातील पाळीव कुत्रे ठेवणाऱ्यांची संख्या वाढली. पण, अनेकांनी महानगर पालिका, नगरपरिषद व नगर पंचायतीमध्ये नोंदणी केली नाही. चंद्रपूर शहरात श्वानदंशाच्या घटना वाढण्यासाठी हेच कारण असल्याचे वन्यजीव व पशुप्रेमी श्रीधर नांदूरकर यांचे म्हणणे आहे.
मोकाट असो की भटके कोणत्याही कुत्र्याने चावा घेतल्यानंतर नागरिकांनी तीन तासांच्या आत रूग्णालयात दाखल व्हावे. वेळेत उपचार झाले तर रेबिज आजारावर मात करता येतो. सर्वच ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर