चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 10:44 PM2023-05-11T22:44:03+5:302023-05-11T22:44:57+5:30
Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली.
राजेश भोजेकर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी हाताला चाटून गेल्याने रावत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या घटनेने मूल शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर संतोषसिंग रावत यांनी थेट मुल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली आहे. यानंतर मुल पोलिसांनी मुल शहरात सर्वत्र नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. परंतु पोलिसांना आरोपी गवसला नसल्याची माहिती आहे. पोलिसांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मूल शाखेतील सीसीटीव्ही कॅमेराची चौकशी केली असता हल्लेखोर एमएच 34 6152 या मारुती स्विफ्ट डिझायर कारने घटनास्थळी आले होते, असे निदर्शनास आले आहे या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे
प्राप्त माहितीनुसार, संतोषसिंग रावत हे मुल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बसले होते. तेथून बाहेर पडताच हल्लेखोर चारचाकी वाहनातून तिथे पोहोचले. त्या कारमधून बुरखाधारी एक हल्लेखोर मागच्या दारातून बाहेर आला आणि काहीही कळायच्या आत त्याने रावत यांच्यावर गोळीबार केला. मात्र त्याचा निशाणा चुकल्याने बंदुकीची गोळी रावत यांच्या हाताला चाटून गेली. यामुळे रावत थोडक्यात बचावले. मूल शहरात अचानक झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. उद्या दिनांक 13 मे रोजी बाजार समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे बघितले जात आहे. रावत यांच्यावर गोळी झाडणारा त्यांचा विरोधक कोण आहे? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. मूल पोलिसांनी रावत त्यांच्या तक्रारीवरून शहरात सर्वत्र नाकाबंदी केली आहे. मात्र अद्यापही कोणीही पोलिसांच्या हाती लागले नाही.