चंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदी- १४४ कलम लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:38+5:30
२० मार्चपासून जिल्ह्यामध्ये जमावबंदी प्रतिबंधक १४४ लागू करण्यात येत आहे .सार्वजनिक ठिकाणी आणि पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यासाठी या कलमाद्वारे मज्जाव करण्यात येतो. नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असून या काळामध्ये नागरिकांचा परस्परांची संपर्क येऊ नये, यासाठी जिल्ह्यांमध्ये जमाव बंदीची १४४ कलम लागू करण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केली आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यात कुठेही पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. फिलिपाइन्सवरून आलेले दोन नागरिकांसह चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून आलेल्या ४७ नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आज उपाययोजना संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गहलोत याशिवाय जिल्हा परिषद, महानगरपालिका व विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजना व नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद याबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी कोरोना संसर्ग ही बाब अतिशय गंभीरतेने घेऊन गरज नसताना बाहेर पडूच नये, अशी सूचना या बैठकीत अनेकांनी केली. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबापासून दूर घरीच एकांतात राहणे योग्य ठरेल, असा वैद्यकीय सल्ला यावेळी देण्यात आला.
त्यामुळे २० मार्चपासून जिल्ह्यामध्ये जमावबंदी प्रतिबंधक १४४ लागू करण्यात येत आहे .सार्वजनिक ठिकाणी आणि पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यासाठी या कलमाद्वारे मज्जाव करण्यात येतो. नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केला आहे. जिल्ह्यामध्ये ११ ते ते ६ पर्यंत सर्व प्रकारची व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रत्येक व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर साबण, सॅनीटायझर, हात धुण्याची सुविधा उपलब्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाजी दूध औषधे हे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरु राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नसून तूर्तास अकरा ते सहा पर्यंत सर्व दुकाने उघडे ठेवता येणार आहे.
विदेशातून येणाऱ्या नागरिकांचे होम कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने संशय आल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदेशातून चंद्रपूरमध्ये आलेल्या सर्व प्रवाशांची प्रशासन संपर्क साधत आहे. संशयित रुग्ण किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्या गेल्यास पोलिसांची मदत घेण्याचेसुद्धा निर्देश आज देण्यात आले.
विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ४७
जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ४७ झाली आहे. हे सर्व नागरिक धोक्याबाहेर आहेत. बुधवारी लंडनहून आलेल्या तीन नागरिकांचा अहवालही निगेटिव्ह आहे. त्यानंतर नागपूरवरून आलेल्या एका संशयित रूग्णाबाबतचा अहवालही निगेटिव्ह असून तो धोक्याबाहेर आहे.फिलिपाइन्सवरून आलेल्या दोन नागरिकांना होम कोरेंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या बोगस आणि सॅनिटायझर विकण्याचा प्रयत्न करणाºया दोन मेडिकल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यावरून येणाºया कोणत्याही खासगी वाहतूकधारकांनी अधिकचे पैसे घेतले असल्यास त्याची थेट तक्रार आरटीओ कार्यालयात प्रवाशांनी करावी. या ट्रॅव्हल एजंटवर कारवाई करण्याचे निर्देश गुरुवारी बैठकीत उपस्थित उपप्रादेशिक अधिकारी शिंदे यांना देण्यात आले आहे.
रक्तदान करा
जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्तदात्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान करणे बंद केले. याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या काळामध्ये मोठया प्रमाणात राज्यात रक्ताचा तुटवडा भासतो आहे. महाराष्ट्रमध्ये दर दिवशी साडेचार ते पाच हजार रुग्णांना रक्ताची गरज असते. रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भीती अथवा संभ्रम निर्माण झालेला असू शकतो. मात्र सद्यस्थितीत रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची अत्यंत गरज असून मोठया प्रमाणात रक्तदान करण्यात यावे, असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये विशेष काळजी घेतली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या लढाई सोबत रक्तदानाचे आवाहनही नागरिकांनी स्वीकारावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले.