चंद्रपूर जिल्हा झाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा 'पॉवर हब'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:14 PM2019-06-24T12:14:04+5:302019-06-24T12:14:30+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी. महाराष्ट्राचे दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही चंद्रपूरचेच. आता विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी. महाराष्ट्राचे दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही चंद्रपूरचेच. आता विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत. त्यामुळे तीन वजनदार नेत्यांचे मूळ ठिकाण असलेला चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा 'पॉवर हब' बनला आहे.
वडेट्टीवार यांच्या रूपाने विदर्भाला पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते पदाचा मान मिळत आहे. त्यांनी तरुण वयात गडचिरोली येथून शिवसेनेच्या युवा संघटनेत सामील होऊन आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला होता. नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत नामनियुक्त सदस्य ते विरोधी पक्ष नेता हा प्रवास त्यांनी केला. शेतमजूर, वनकामगार आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी अनेकदा लढे दिले, आंदोलने केली.
विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्ष नेतेपदामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन मोठे राजकारणी राज्यात अधिकारारुढ झाले असून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.