स्वच्छतेत चंद्रपूर जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:40+5:30
किरण बगमारे यांनी दोन हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट, १९ महिला बचत गटातील २१५ महिलांचा स्वतंत्र महिला गट तयार करुन गावात स्वच्छतेबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे काम केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालया अंतर्गत स्वच्छता महोत्सव २०१९ अंतर्गत स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या विविध स्तरावरील व्यक्तीचे नामांकन देशभरातून मागविण्यात आले होते. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा गावच्या स्वच्छताग्रही यांचे काम उत्कृष्ठ दर्जाचे ठरल्यामुळे नुकतेच दिल्ली येथे आयोजित विज्ञान भवन येथे स्वच्छता महोत्सव २०१९ या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिह शेखावत यांच्या हस्ते किरण बगमारे यांना सन्मानित करण्यात आले. यामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचाच देशपातळीवर सन्मान झाला आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने दिल्ली येथील विज्ञान भवन येथे स्वच्छता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया, पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, अरुण बोकारो यावेळी मंचावर उपस्थित होते.
किरण बगमारे यांनी दोन हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट, १९ महिला बचत गटातील २१५ महिलांचा स्वतंत्र महिला गट तयार करुन गावात स्वच्छतेबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे काम केले. गावातील सार्वजनिक शौचालयावर देखरेख ठेवून येथे स्वच्छता व अनुषंगिक बाबी पुरविल्या. दिल्ली येथील कार्यक्रमात देशभरातील २७ स्वच्छताग्रहींचा सन्मान करण्यात आलेला असून यामध्ये महाराष्ट्रातून देशपातळीवर सन्मानित झालेल्या किरण बगमारे या एकमेव उत्कृष्ट स्वच्छताग्रही ठरल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा देशपातळीवर मिळालेल्या बहुमानाविषयी महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय चंहादे यांनी चंद्रपूर जिल्हयाचे कौतुक केले. यावेळी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था वासो मुंबईचे संचालक राहुल साकोरे, महिती शिक्षण संवाद तज्ञ कुमार खेडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे व ग्रामसेविका शमा नान्होरीकर, कृष्णकांत खानझोडे, एचआरडी बंडु हिरवे प्रामुख्याने उपस्थित होते.
गावागावात स्वच्छताग्रहीची गरज
किरण बगमारे महाराष्ट्र राज्यातून स्वच्छता महोत्सवात एकमेव उत्कृष्ठ स्वच्छताग्रही ठरल्या आहेत. याच प्रमाणे प्रत्येक गावात उत्कृष्ठ स्वच्छताग्रही निर्माण झाल्यास चंद्रपूर जिल्हात शाश्वत स्वच्छतेचा मानस पूर्ण करु शकणार आहे. स्वच्छता क्षेत्रात देशपातळीवर सन्मानित होणे ही चंद्रपूर जिल्हाला प्रेरणा देणारी व अभिमानाची बाब ठरली आहे.