प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपूर जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:18 AM2019-06-05T00:18:32+5:302019-06-05T00:19:04+5:30
शहरीकरण व औद्योगिकीकरणाने जिल्ह्यात जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विकासाच्या नवनवीन संकल्पना अंमलात आणताना प्रदूषण नियंत्रण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मानवाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे.
जागतिक पर्यावरण दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरीकरण व औद्योगिकीकरणाने जिल्ह्यात जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विकासाच्या नवनवीन संकल्पना अंमलात आणताना प्रदूषण नियंत्रण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मानवाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. प्रदूषणाच्या या जीवघेणी विळख्यापासून नागरिकांची केव्हा सुटका होईल, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनालाही देता येत नाही, अशी भयानक स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्याच्या भूगर्भात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती आहे. कोळसा उत्पादनात हा जिल्हा देशभरात सतत अव्वलस्थानी राहिला आहे. जिल्ह्याच्या विकासात कोळसा खाणींचे मोठे योगदान असले तरी प्रदूषणाला आळा घालण्यात अपयश आले. कोळशाचे विक्रमी उत्पादन करताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या समांतर यंत्रणा बिनकामी ठरल्या. दिवसेंदिवस होणारा नैसर्गिक संपत्तीचा ºहास व वाहनांची वाढती संख्या नवीन समस्यांना जन्मास घालत आहे. याला तत्काळ आळा न घातल्याने दरवर्षी हजारो नागरिक बळी जात आहेत.
ओझोन वायूप्रदूषण हे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कोळसा खाणी, विविध प्रकारचे लहान-मोठ्या उद्योगातून श्वसनाचे आजार वाढत आहेत. दमा, ब्रोकायटीस, हृदयरोगींची संख्या वाढली.
कार्बन मोनोकसाईड वायू हा हायड्रो कार्बन ज्वलन, इंधन, वाहने,वीज निर्मिती केंद्र, कोळसा, कचरा ज्वलन हा वायू निघतो या वायुमुळे थकवा,चक्कर, उलटी येणे,पोटदुखी, श्वसनाचे त्रास, ब्लू बेबी सिंड्रोम, आॅक्सिजनची कमरता व मानसिक समस्या निर्माण होत आहेत.
बेंझिन वायु प्रदूषणासाठीही विविध प्रकारचे उद्योग कारणीभुत आहे. हा वायू कॅन्सर, बोन मेरो क्षती, लुकेमिया, अनिमिया, लिव्हर, किडनी,लंग, हार्ट, ब्रेनला हानिकारक आहे. वेळेवर उपचार झाले नाही तर डीएनए क्षती होऊन कायमचे अपंगत्व येण्याचा धोका आहे.
जिल्ह्यातील उद्योगांमुळे प्रदूषित धूलिकणांची संख्या वाढली. वातावरणात विषारी घटक पसरल्याने मानवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे एकीकडे अवेळी मृत्यू तर दुसरीकडे वाढत चाललेली रोगराई सध्या सर्वात मोठा चिंतेचा विषय झाला आहे.
सूक्ष्म धूलिकण हे वीज निर्मिती केंद्र, उद्योग, वाहतुक,वाहनांचा धूर, कोळसा,कचरा ज्वलन आणि बांधकामाच्या क्रियेतून निमार्ण होतो. या प्रदूषणामुळे दमा, खोकला, श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे विकार आणि क्रोनीक ब्रँकोयटीस आदी आजार होत आहेत.
सल्फरडाय आॅक्साइड हा वीज निर्मिती केंद्र, कोळसा ज्वलन व जैविक कचरा ज्वलनातून बाहेर पडतो.या वायुमुळे श्वसनाचे आजार, दमा, क्रोनिक ब्रोकोयटीस,फुफ्फुसाचे विकार, खोकला, डोळे व त्वचेची जळजळ होण्याचे आजार वाढले आहेत.
नायट्रोजन डॉयआॅक्साइड हा वायू वाहने,कोळसा ज्वलन, कचरा ज्वलन प्रक्रियेतून निर्माण होतो. वायू प्रदूषणामुळे नाक,गळ्यात जळजळ, फुफ्फुसाचे विकार, दमा, दृष्टीदोष व श्वसनाचे रोग होतात.
प्रशासन काय उपाय करतेय?
प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गडचिरोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील १ मनपा व २२ नगर परिषदांमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम सुरू आहे.
नद्यांमधील जल प्रदूषणाला प्रतिबंध घालून शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न.
नॅशनल वॉटर मॉनिटरींग अंतर्गत पाण्याची गुणवत्ता तपासली जाते.
जलप्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखड्यानुसार वर्षभर उपाययोजना केल्या जातात.
अतिप्रदूषित चंद्रपूर शहराकरिता विशेष कृती आरखड्यानुसार कार्य सुरू आहे.
जल, वायू व ध्वनी प्रदूषणाच्या प्रतिबंधाकरिता आरटीओ, नगर परिषद, मनपा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही काम केल्या जात आहे.
आराखड्यानुसार उपाययोजना केल्याने २०१० च्या मूल्यांकनात चंद्रपूर शहर ८१ वरून ५४ वर आले.
उद्योगांचा घनकचरा बुट्टीबोरी तर रूग्णालयातील सुपर हायजेनिक कचºयाचे चंद्रपुरातील एमआयडीसी परिसरात विल्हेवाट लावल्या जाते. हवा प्रदूषणासाठी स्टार रेटींग अॅनालिसीस कार्यक्रम सुरू आहे.
चंद्रपूर शहराकरिता नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर.
कोळशावर आधारीत सुरू असलेले उद्योग मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत. अशा उद्योगांना सरकारने प्रोत्साहन देऊ नये. पाणी, वायू प्रदूषणासाठी हेच उद्योग कारणीभूत असल्याने आता नवीन उद्योगांची गरज आहे. विशेषत: शेतीवर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले पाहिजे. यातून प्रदूषणाची समस्या कमी होईल.
- डॉ. योगेश दुधपचारे, अभ्यासक
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध प्रकारचे मूलभूत कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास समस्या सुटू शकतात. जिल्ह्यात वायु, जल व ध्वनी प्रदूषणाची समस्या सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना झाली नाही तर नागरिकांचे जगणे मुश्कील होईल. पर्यावरण जागृती हा विषय शासनासह समाजातील साºयाच घटकांनी जबाबदारीने समजावून घेतला पाहिजे.
- प्रा. सुरेश चोपणे,अभ्यासक