भाव मिळत नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दूध उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 02:45 PM2018-09-06T14:45:34+5:302018-09-06T14:46:03+5:30
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी निराशा आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आशिष देरकर
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी निराशा आली आहे.
डेअरीच्या माध्यमातून नांदाफाटा, गडचांदूर व कोरपना येथे दूध संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहेत. या दूध संकलन केंद्रांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. किरकोळ पद्धतीने दूध विकण्यापेक्षा एकाच ठिकाणी संकलन केंद्रावर दूध विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा दारोदारी जाऊन दूध विक्रीकरिता होणारा त्रास कमी झाला. मात्र दूध संकलन केंद्रावर कवडीमोल भावात दुधाची खरेदी करीत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून हरियाणा, राजस्थान, गुजरात व इतर काही राज्यांमधून गाई व म्हशींची आयात केली. दुधाळ जनावरांमध्ये गुंतवणूक करून व्यवसाय करून अर्थक्षम होण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र सध्या परिस्थितीत अनेक दूध उत्पादकांना दुग्ध व्यवसाय करताना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. लाखो रुपये खर्चून दुधाळ जनावरे घेतल्यामुळे व्यवसाय तर बंद करता येत नाही, तर कमी नफ्यात कसातरी व्यवसाय चालवावा या आशेवर दूध उत्पादक शेतकरी सध्या परिस्थितीत जगत आहे
दुग्ध व्यवसाय करताना दुधाळ जनावरांत सोबतच इतर अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक शेतकऱ्यांनी केली. विशेष म्हणजे शेतात जनावरांना चारा लावणे, दूध वाढण्यासाठी पोषक ठरणारे खाद्य खरेदी करणे, मजुरांना लागणारा खर्च, जनावरांसाठी शेड, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, दूध काढणी यंत्र अशा अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे शेतकरी व्यवसाय तर बंद करू शकत नाही. मात्र मिळेल त्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना समाधान मानण्याची वेळ आली आहे.
घरोघरी जास्त किंमतीत विक्री
अनेक शेतकरी डेअरीमध्ये दुधाची विक्री न करता वैयक्तिक घरोघरी फिरून दुधाची विक्री करतात. त्याठिकाणी शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रुपये प्रति लिटर तर गाईच्या दुधाला ४० ते ५० रुपयापर्यंत प्रति लिटर भाव मिळतो तेच दूध डेअरीमध्ये विक्रीस नेल्यास कमीत कमी किंमत 23 रुपये आहे. अशावेळी शेतकरी उरलेले दूध डेअरीमध्ये विकत असल्याचे दिसून येते.
शासनाने घ्यावी दखल
एकीकडे शासन शेतकऱ्यांनी पयार्यी व्यवसाय करावा किंवा जोडधंदा करावा यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. ज्या शेतकऱ्यांनी धोका पत्करून जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला आहे अशा शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी शासनाने घेण्याची आवश्यकता आहे. कारण शेतकऱ्यांना अशाप्रकारचे संरक्षण न मिळाल्यास शेतकरी जोडधंद्याकडे किंवा पयार्यी व्यवसायाकडे वळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकणार नाही. एकंदरीत त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो. त्यामुळे शासनाने दूध उत्पादकांच्या समस्या निकाली काढून दुधाला जास्तीत जास्त भाव देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दूध विक्रेत्यांसाठी सिमेंट कंपन्या सोयीच्या
कोरपना तालुक्यात अल्ट्राटेक, माणिकगड व अंबुजा येथील वस्त्यांमध्ये दुधाला प्रचंड मागणी आहे. परिसरातील अनेक गावातील दूध उत्पादक सिमेंट वस्त्यांमध्ये दूध विक्री करणे पसंत करतात. किरकोळ विक्रीमधून दूध उत्पादकाला जास्त नफा प्राप्त होतो. किरकोळ विक्रीतून मिळणाऱ्या किंमतीइतकाच भाव दूध उत्पादकांना शासनाकडून मिळावा अशी दूध उत्पादकांची मागणी आहे.
जनावरांच्या खाद्याची किंमत गगनाला
दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. मात्र हे खाद्य महाग असल्याने तिथेही शेतकऱ्यांचे हाल आहे. यामध्ये जनावरांना लागणारी ढेप २ हजार ३०० रुपये क्विंटल, मका चुनी १६०० रुपये क्विंटल व तूर चुनी १७०० रुपये क्विंटल असे भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना अल्प नफ्यामध्ये जास्त काम करावे लागत आहे.