चंद्रपूर जिल्ह्याला ‘मॉडेल हेल्थ डिस्ट्रिक’ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:44 PM2019-02-05T22:44:47+5:302019-02-05T22:45:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर आणि ठाणे हे दोन जिल्हे ‘मॉडेल हेल्थ डिस्ट्रिक’ म्हणून विकसित करावेत, अशा सूचना ...

Chandrapur district 'Model Health District' | चंद्रपूर जिल्ह्याला ‘मॉडेल हेल्थ डिस्ट्रिक’ करा

चंद्रपूर जिल्ह्याला ‘मॉडेल हेल्थ डिस्ट्रिक’ करा

Next
ठळक मुद्देआमदार व अधिकाऱ्यांची बैठक : सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर आणि ठाणे हे दोन जिल्हे ‘मॉडेल हेल्थ डिस्ट्रिक’ म्हणून विकसित करावेत, अशा सूचना अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिली.
मॉडेल हेल्थ डिस्ट्रिकचे सादरीकरण अर्थमंत्र्यासमोर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथे झालेल्या या बैठकीस आमदार सुरेश धानोरकर, आ. अ‍ॅड. संजय धोटे, ना. नाना श्यामकुळे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आयुक्त अनुप यादव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपास्थित होते.
आरोग्य विभागाने वर्षभराची दिनदर्शिका तयार करून त्याप्रमाणे राज्यभरात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे, कोणत्या दिवशी कोणते शिबिर आहे, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देशही ना. मुनगंटीवार यांनी दिले. ते पुढे म्हणाले, या अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला जावा. आरोग्य विभागाने प्रत्येक रुग्णाचे हेल्थ कार्ड तयार करावे. ज्यात आतापर्यंत त्याने घेतलेल्या उपचारांची माहिती उपलब्ध व्हावी, रेकॉर्ड व्हावी. मॉडेल हेल्थ डिस्ट्रिक योजनेअंतर्गत जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी एक खिडकी योजना तयार करून रुग्णाला त्याने अर्ज देताच त्याला सर्व आरोग्य सुविधा आपण पूर्ण क्षमतेने देवू शकू, अशी व्यवस्था निर्माण करता येते का, याचा विभागाने अभ्यास करावा, अशी सूचनाही ना. मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात खाण कामगारांची संख्या खूप मोठी असल्यामुळे शंभर खाटांचे भारत सरकारचे कामगार रुग्णालय सुरू करण्याबाबत तसेच ५० खाटांचे आयुष रुग्णालय सुरू करण्याबाबत आयुष मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जावा, असेही त्यांनी सांगितले.
वनपर्यटनाला मोठी संधी
चंद्रपूर हा खाणींचा जिल्हा आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही खूप असल्याने आरोग्याचे प्रश्न मोठे आहेत. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक हा राज्याच्या सरासरी निर्देशांकापेक्षा कमी आहे. जिल्ह्यात वन पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्यामुळे मॉडेल हेल्थ डिस्ट्रिकसाठी चंद्रपूर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. तळागाळातल्या लोकांपर्यंत दर्जात्मक आरोग्य व्यवस्था पोहोचवणे हा या योजनेचा उद्देश आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: Chandrapur district 'Model Health District'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.