चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन डौलात मात्र धान तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:48 PM2020-07-15T12:48:27+5:302020-07-15T12:51:13+5:30
नगदी पीक म्हणून आता धान उत्पादक शेतकरीही कापूस शेतीकडे वळले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी या तालुक्यात धान तसेच कापसाचीही लागवड केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी काही भागात कापूस, तूर, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी अर्ध्याअधिक तालुक्यांमध्ये धान उत्पादन घेतल्या जाते. तर राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर या तालुक्यांमध्ये कापूस तसेच सोयाबीनची लागवड केली जाते. नगदी पीक म्हणून आता धान उत्पादक शेतकरीही कापूस शेतीकडे वळले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी या तालुक्यात धान तसेच कापसाचीही लागवड केली जात आहे.
वरोरा तालुक्यात आजपर्यंत भुईमुगाची पेरणी केली जात नव्हती. रब्बी हंगामात कृषी विभागाने विशेष नियोजन केले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रयोग म्हणून भुईमुगाची लागवड केली. यामध्ये त्यांना चांगले उत्पादन मिळाले. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी तयारी केली. मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक असलेला पुरेसा पाऊस अद्यापही झाला नसल्याने अनेकांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. योग्यवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठी आहे. मात्र यावर्षी बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीही दाखल केल्या आहे. वरोरा व भद्रावती तालुक्यांमध्ये बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अल्प पावसामुळे रोवण्या खोळंबल्या
मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी पावसाची सरासरी कमी आहे. पावसाअभावी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच रोवणीची कामे आटोपली आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरवर्षी जुन-जुलैपर्यंत तालुक्यातील रोवणीचे काम आटोपायची. यावर्षी मात्र स्थिती चांगली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी ४५४ मिली पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.