चंद्रपूर जिल्हा सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:12 PM2020-03-24T22:12:19+5:302020-03-24T22:12:51+5:30
जिल्ह्याच्या विविध भागात नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा सुरू होत्या. तालुकास्थळांच्या सीमेवरही त्या त्या भागातील पोलीस तैनात होते. तरीही काही नागरिक शहरातून फिरताना आढळले. सकाळी काही नागरिक नेहमीप्रमाणे बाहेर पडताना दिसले. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पोलिसांच्या दंड्याचा सौम्य का होईना मार खावा लागला. या शिवाय जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे ऐकिवात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू होताच जिल्ह्याच्या सर्व बाजूच्या सीमा सील करण्यात आल्या. बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच अडविण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागात नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा सुरू होत्या. तालुकास्थळांच्या सीमेवरही त्या त्या भागातील पोलीस तैनात होते. तरीही काही नागरिक शहरातून फिरताना आढळले. सकाळी काही नागरिक नेहमीप्रमाणे बाहेर पडताना दिसले. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पोलिसांच्या दंड्याचा सौम्य का होईना मार खावा लागला. या शिवाय जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे ऐकिवात नाही.
चंद्रपूर महानगरातील रस्त्यांवर सकाळी नागरिक काही प्रमाणात बाहेर पडले होते. मात्र प्रत्येक ठिकाणी पोलीस अडवत असल्यामुळे दुपारनंतर अपवाद वगळता कुणीही फिरकताना दिसले नाही. काहींना पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करावा लागला. शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. किराणा दुकाने, पेट्रोल पंप सुरू होते. हीच स्थिती जिल्ह्यातील चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सावली, मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा व भद्रावती या तालुक्यांची व तालुक्यातील गावांची होती. संचारबंदीमुळे नागरिक कुटुंबीयांसह घरातच राहणेच पसंत केले.
मनपाद्वारे प्रतिबंधात्मक फवारणी
राज्यात करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी महानगर पालिकेने शहरातील सर्व वार्डांमध्ये जंतूनाशक फवारणी सुरू करण्यात आली. बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक, वर्दळीच्या ठिकाणी, पब्लिक कम्युनिटी टॉयलेट व रूग्णालयांमध्ये फवारणी धुरळणी केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी आपली काळजी स्वत: घ्यायची आहे. या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तुंसाठी घराबाहेर पडा, परंतु गरज नसताना घराबाहेर निघू नये, असा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.
चंद्रपुरात ७५ दुचाकीस्वारांना दंड
चंद्रपूर : संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीने शहरात फिरणाऱ्या ७५ दुचाकीस्वारांवर मंगळवारी रामनगर पोलिसांनी विविध कलमातंर्गत दंड ठोठावला. प्रशासनाच्या निर्देशांचे यापुढेही पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व रामनगरचे ठाणेदार हाके यांनी केले.
माणिकगड कंपनी सुरूच - आमदाराची तक्रार
कोरपना : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन परिश्रम घेत आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मंगळवारी माणिकगड सिमेंट कंपणीने कामगारांना कामावर बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीत शेकडो कामगार कामावर आहेत. सर्व कंपन्या बंद करण्याचे आदेश असताना या कंपनीने कामगारांना कामावर बोलाविल्याने कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकºयांकडे केली आहे.