चंद्रपुरातील सात सहायक पोलिस निरीक्षक बनले पोलिस निरीक्षक; अनेक महिन्याच्या लढ्याला यश
By परिमल डोहणे | Published: June 17, 2024 06:52 PM2024-06-17T18:52:42+5:302024-06-17T18:54:16+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सात जणांना बढती मिळाली असल्याने ते सहायक पोलिस निरीक्षकावरून पोलिस निरीक्षक बनले आहेत.
चंद्रपूर : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाखल झालेल्या विविध याचिकांमुळे सहायक पोलिस निरीक्षकांची पदोन्नती बरेच महिने रखडली होती. मात्र, महाराष्ट्र पोलिस विभागाने न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अधीन राहून ४४९ पोलिसांना पदोन्नती दिली आहे. याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील सात जणांना बढती मिळाली असल्याने ते सहायक पोलिस निरीक्षकावरून पोलिस निरीक्षक बनले आहेत. परंतु, त्यांची इतर जिल्ह्यात बदली झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांची गडचिरोली, माजरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सारंग मिराशी यांची नागपूर, पडोली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नागेशकुमार चातरकर यांची नागपूर शहर, पोलिस अधीक्षकांच्या वाचक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे यांची नागपूर शहर, अपर पोलिस अधीक्षकांच्या वाचक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश ठाकरे यांची गडचिरोली, दुर्गापूर सहायक पोलिस निरीक्षक विजय रत्नपारखी यांची अकोला, तर बल्लारपूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण तळी यांची बुलढाणा येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे.
पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांची यादी विभागीय पदोन्नती समितीने तयार केली होती. मात्र, याबाबत काही सहायक पोलिस निरीक्षकांनी न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया बरेच दिवस प्रलंबित होती. दुसरीकडे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांनीही पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी, अशी याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाखल केली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या विविध आदेशांच्या अधीन राहून विभागीय पदोन्नती समितीने राज्यातील ४४९ सहायक पोलिस निरीक्षकांची पोलिस निरीक्षकपदावर पदोन्नती केली आहे. पदोन्नती देण्याबरोबरच त्यांच्या पदस्थापनेचे ठिकाणसुद्धा बदलण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सात सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. पदोन्नतीसाठी दिलेल्या लढ्याला अनेक महिन्यांनंतर यश आल्याने पदोन्नती झालेल्या पोलिस निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.