चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकाने केले विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 09:16 PM2018-04-14T21:16:57+5:302018-04-14T21:17:11+5:30
नागभीड तालुक्यातील मेंढा (चारगाव) शाळेतील विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षकास तळोधी(बा) पोलिसांनी गजाआड केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मेंढा (चारगाव) शाळेतील विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षकास तळोधी(बा) पोलिसांनी गजाआड केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.
दिवाकर रूषी डोंगरवार (४२) असे या शिक्षकाचे नाव आहे. तो नागभीड तालुक्यातील मेंढा चारगाव जि.प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मेंढा चारगाव येथील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत हा शिक्षक मागील काही दिवसांपासून असभ्य वर्तन करीत होता. तिला पेन्सीलने कागदावर अश्लिल भाषेत काहीही लिहून द्यायचा आणि वाचायला लावायचा. यासारखे अनेक लज्जास्पद प्रकार तो करीत होता.
अखेर शाळेत घडत असलेले हे संपूर्ण प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी लगेच शाळा शिक्षण समिती व नागभीड पंचायत समितीच्या शिक्षणाधिकाºयांना बोलावून त्याना हा प्रकार सांगितला व शिक्षकावर कारवाईची मागणी केली. यासोबत मुलीच्या पालकांनी तळोधी(बा) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन तळोधी(बा) पोलिसांनी अपराध क्रमांक १०४/२०१८ अल्पवयीन मुलीचा विनयभंग व गैरवर्तणूक प्रकरणी कलम ३५४ अ ८३ व पास्को १२ लावून अटक केली. न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर शिक्षकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास पीएसआय ठाकूर करीत आहे.