पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रपूर जिल्हा विभागात अव्वल; नागपूर दुसरा!
By साईनाथ कुचनकार | Published: May 2, 2024 08:15 PM2024-05-02T20:15:07+5:302024-05-02T20:16:34+5:30
आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४७ तर पाचवीतील १ हजार ७१९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले.
साईनाथ कुचनकार/ चंद्रपूर: सन २०२३- २४ या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घोषित झाला. या परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याने यशाची उत्तुंग भरारी घेत पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (इयत्ता पाचवी)च्या शिष्यवृत्ती परीक्षेत नागपूर विभागात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. मागील तीन वर्षात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीमधील शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालामध्ये पात्रतेच्या टक्केवारीमध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. पाचवीच्या निकालामध्ये नागपूर दुसऱ्यास्थानी, गोंदिया तिसऱ्या स्थानावर आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रामध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या प्रेरणेतून, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या नियोजनमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले होते. यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा सराव चाचणी उपक्रम राबविण्यात आला. तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या सहाय्याने एकूण आठ सराव चाचण्या घेण्यात आल्या. आठही सराव चाचण्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पाचवी मधील एकूण ५ हजार ७०० व इयत्ता आठवीमधील ४ हजार ३०० विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांनी यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे. आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४७ तर पाचवीतील १ हजार ७१९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर (प्राथमिक व माध्यमिक विभाग) यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये इतर वर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ होऊन जिल्ह्याने विभागात भरारी घेतली आहे.
- वर्ग आठवा- उत्तीर्ण विद्यार्थी ५४७
- वर्ग पाचवा- उत्तीर्ण विद्यार्थी -१७१९
अशी आहे पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेची जिल्हानिहाय टक्केवारी-
- चंद्रपूर २२.५० टक्के
- नागपूर २०.४४ टक्के
- गोंदिया १८.९० टक्के
- वर्धा १४.२५ टक्के
- भंडारा १२.४० टक्के
- गडचिरोली ९.१८ टक्के