चंद्रपूर : लालपेठ कोळसा खाणीचे उत्पादन बंद, कामगारांमध्ये केंद्र शासनाविरुद्ध रोष; कोणतीही लेखी सूचना नसल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 03:21 PM2017-09-25T15:21:32+5:302017-09-25T15:22:08+5:30
तोट्यात चालत असल्याच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन कोळसा खाणी बंद करण्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. अशातच सोमवारी येथील लालपेठ नं. १ या कोळसा खाणीतील कोळसा उत्पादन व्यवस्थापनाने उत्पादन बंद केले आहे.
चंद्रपूर : तोट्यात चालत असल्याच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन कोळसा खाणी बंद करण्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. अशातच सोमवारी येथील लालपेठ नं. १ या कोळसा खाणीतील कोळसा उत्पादन व्यवस्थापनाने उत्पादन बंद केले आहे. यामुळे कामगारांमध्ये केंद्र शासनाविरोधात कमालीचा रोष निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे, तर सकाळी कामगारांनी खाण क्षेत्रात केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली.
दोन दिवसांपूर्वी वकोलिचे चंद्रपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक व लालपेठ क्र. एक कोळसा खाणीचे व्यवस्थापक यांनी भेट देऊन सोमवारपासून ही खाण बंद होणार असल्याचे तोंडी सांगितले होते. मात्र सूचना फलकावर याबाबतची कुठलिही नोटीस लावली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. देशातील ३७ कोळसा खाणी बंद करण्यात येणार असून यामध्ये तीन कोळसा खाणी चंद्रपूर क्षेत्रातील असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. दुर्गापूर रय्यतवारी कोळसा खाण यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. आज हिन्दूस्थान लालपेठ क्र. एक ही भूमिगत कोळसा खाण बंद करण्यात आली आहे. यानंतर महाकाली खोळसा खाण होण्याची शक्यता आहे.
लालपेठ खाण नं. १ कोळसा खाणीमध्ये मनुष्यबळ कमी असतानाही जास्त उत्पादन घेतले जात आहे. सेफ्टीमध्ये बेस्ट खाण म्हणून सतत तीनवेळा सन्मानित करण्यात आले. २०१५ रोजी मॅनरायडर्सला केंद्र शासनाने मान्यता दिली. मॅनरायडर्सच्या माध्यमातून कामगारांना फिड बॉटमपासून, तर सेक्शनपर्यंत जाण्यासाठी एक तास लागायचा आता हे अंतर केवळ १५ निमिटात पूर्ण केले जाते. या कोळसा खाणीत सुमारे २५ वर्षे पुरेल इतका कोळसा उपलब्ध आहे. असे असताना या खाणीचे उत्पादन बंद करण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सिटु, एचएमएस, बीएमएस आणि आयटक या कामगार संघटनांनी एकत्र यावर आंदोलनाची भूमिका विषद केली होती.
जिल्ह्यातील तीनही भूमिगत कोळसा खाणी या इंग्रजकालिन आहे. वेळ आणि गरजेनुसार या खाणींमध्ये मोठा बदल करण्याची गरज होती. यामध्ये कोळश्याची किंमत तसेच उत्पादनाचा ताळमेळ साधला जावा, याकडे व्यवस्थापनाने कानाडोळा केला. केवळ केवळ लोडरच्या जागी मशीनच्या उपयोगाशिवाय दुसरे कोणतेही पाऊल उचलले नाही. परिणामी, खाणींमध्ये उत्पादन खर्चात वाढ होत गेली. हिन्दुस्तान लालपेठ खाण क्रमांक एकमध्ये ६ हजार २२ रुपये प्रतिटन उत्पादन खर्च येत आहे. दुर्गापूर रय्यतवारी खाणीत हा खर्च १० हजार ९७ रुपये आहे, तर महाकाली खोळसा खाणीत हा खर्च १२ हजार १६७ प्रतिटन आहे. हा खर्च कोळसा बाजारात सर्वाधिक आहे. हा खर्च कमीअधिकही होत असतो, असे कारण पुढे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या खाणींमध्ये अनुक्रमे ४२९, ७२७ व २६१ असे एकूण १ हजार ४१७ कामगार कार्यरत आहे. या कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.