यू-ट्यूबवरून घेतले धडे अन् बहरली ड्रॅगन फळाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 10:45 AM2022-03-07T10:45:37+5:302022-03-07T11:20:31+5:30
वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडलांतर्गत येणाऱ्या आबमक्ता येथील युवा पदवीधर शेतकरी मनीष मारोतराव पसारे यांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाबद्दल माहिती घेऊन अभ्यास केला.
प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : अलीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीकडे वळत आहेत. यातच अनेक औषधी गुणधर्म असणारे ड्रॅगन फळ आहे. वरोरा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच पाच शेतकऱ्यांनी एकाचवेळी ड्रॅगन फळाच्या वेलीची लागवड केली असून, ही नावीन्यपूर्ण शेती बघण्याकरिता शेतकरी त्या शेतावर मोठ्या प्रमाणात जाऊन पाहणी करत आहेत.
उष्णकटिबंध प्रदेशात ड्रॅगन फळ असलेल्या वेलाची लागवड केली जाते. ड्रॅगन फळाची वेल कॅक्टसप्रमाणे असून, त्याला काटे असतात. कॅन्सर, डेंग्यू, हार्टअटॅक, मधुमेह या आजारांवर ड्रॅगन फळ फार गुणकारी असल्याचे मानले जाते. वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडलांतर्गत येणाऱ्या आबमक्ता येथील युवा पदवीधर शेतकरी मनीष मारोतराव पसारे यांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाबद्दल माहिती घेऊन अभ्यास केला.
ही बाब शेगावचे मंडल कृषी अधिकारी विजय काळे यांना सांगितली. त्यांनी शेतावर जाऊन या शेतकऱ्याला मार्गदर्शन केले व प्रोत्साहित केले. लातूर, सांगोला येथून दीड लाख रुपये खर्च करून रोपे आणली. त्यानंतर एक एकर शेतीत बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर ट्रेलर पद्धतीने लागवड केली. यामध्ये टिंब पद्धतीने पाणी देण्यात येत असल्याने पाण्याचा वापर कमी होतो. ड्रॅगन फळ उष्ण वातावरणात वाढत असल्याने आपल्या भागातील वातावरणात त्याला कुठलाही धोका होणार नसल्याचे मानले जात आहे.
एकदा लागवड केल्यानंतर त्याची वारंवार छाटणी केली जाते. पंधरा वर्षांपर्यंत नवीन रोप लावण्याची आवश्यकता नसते. एक वर्षांनी फळ लागते. फळ झाडाला पिकते. पहिल्या वर्षी तीन ते चार लाखांचे उत्पादन, नंतर सात ते आठ लाखांचे उत्पादन अपेक्षित असल्याचे मत लागवड करणारे शेतकरी व्यक्त करत आहेत.
..या शेतकऱ्यांनी केली लागवड
वरोरा तालुक्यात मनीष पसारे (आबमक्ता), भूषण ठाकरे (सोनेगाव), सुमित किनाके (आबमक्ता), अमोल पिसे व अमोल महाकुलकर (माढेळी) या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाची लागवड केली आहे. वरोरा, चंद्रपूर, नागपूर बाजारपेठेत ड्रॅगन फळ विकण्याचा मानस या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
ड्रॅगन फळातील पोषक घटक
एका ड्रॅगन फळामध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, १३ ग्रॅम प्रथिने, १.२ ग्रॅम विटामीन सी, तीन टक्के लोह, चार टक्के मॅग्नेशियम, दहा टक्के फायबर असते.
ड्रॅगन फळ हे उष्ण कटिबंधीय फळ असून, यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम असल्यामुळे अनेक आजारांवर ते काम करते. आपल्या भागात लागवडीला भरपूर वाव असल्याने एकात्मिक फलोद्यान अभियानाच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
- विजय काळे, मंडल कृषी अधिकारी, शेगाव