Chandrapur: सासऱ्याची चाकू भोसकून हत्या; तर सासूला केले जखमी, जावयास आजन्म करावास, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By परिमल डोहणे | Published: May 12, 2023 02:57 PM2023-05-12T14:57:26+5:302023-05-12T14:57:58+5:30
Chandrapur Crime News: सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करून सासूला जखमी करणाऱ्या जावयास जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आजन्म कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली.
- परिमल डोहणे
चंद्रपूर - सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करून सासूला जखमी करणाऱ्या जावयास जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आजन्म कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. निलकंठ यशवंत कांबळे (30) रा. हिरापूर तालुका सावली असे शिक्षा झालेल्या जावयाचे नाव आहे. ईश्वर मडावी मृत सासऱ्याचे तर कौशल्याबाई मडावी जखमी सासूचे नाव आहे.
निलकंठ कांबळे व मनीषा मडावी या दोघांच्या प्रेम विवाहाला घरचा विरोध होता. मनीषा तंटामुक्त समितीमध्ये गेल्याने समितीच्या पुढाकाराने त्यांचा प्रेम विवाह झाला होता. काही दिवस दोघे पती पत्नी किसाननगर येथे वास्तव्यास राहिल्यानंतर ते आपल्या सासऱ्याकडे हिरापूर येथे राहायला गेले. 16 डिसेंबर 2019 रोजी मनीषा व तिचा पती झोपडी बांधण्यासाठी लाकडे आणायला जंगलात गेले यावेळी नीलकंठने मनीषाला तू तंटामुक्त समितीमध्ये का गेली, या कारणावरून वाद करत तिला मारहाण केली. त्यामुळे ती एकटीच घरी गेली. दरम्यान काही वेळाने निलकंठही सासऱ्याच्या घरी गेला. यावेळी घरी सर्वजण जेवण करत होते. नीलकंठने वाद घालत सासऱ्याला चाकूने भोसकले तर पतीच्या बचावासाठीमध्ये आलेल्या सासूवरही नीलकंठने वार केला. यात सासरा ईश्वर मडावी याचा मृत्यू झाला तर सासू कौशल्याबाई जखमी झाली.
मुलीच्या तक्रारीवरून सावली पोलिसात कलम 302, 307 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी तत्कालीन एसडीपिओ अनुज तारे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानीशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाचा निकाल देताना जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.अनिता नेवासे यांनी आरोपी निलकंठ कांबळे याला कलम 302 अन्वये आजन्म कारावास व दहा हजार रुपयांचा दंड तर कलम 307 मध्ये आजन्म कारावास व पाच हजार रुपयांचा दंड थोटावला. सरकारी वकील म्हणून ॲड. सुधाकर डेगावार तर कोर्ट पैरवी म्हणून नापोका सपना बेल्लावार यांनी काम बघितले.