चंद्रपूरपाठोपाठ ब्रम्हपुरी तालुका कोरोनाचा हॉटस्पाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:57+5:30
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सर्वाधिक २० रुग्ण तालुक्यातील मांगली (जुगनाळा) येथे आढळून आले आहेत. तालुक्यात गुरुवारी एकाच दिवसात २८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता कोरोनाचा हॉटस्पाट ठरु पाहत आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्या १०८ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येतील वाढ सातत्याने सुरू असून गेल्या २४ तासात त्यामध्ये २८ बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ७७७ बाधित पुढे आले असून ४३८ जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी मिळाली आहे तर ३३९ बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सर्वाधिक २० रुग्ण तालुक्यातील मांगली (जुगनाळा) येथे आढळून आले आहेत. तालुक्यात गुरुवारी एकाच दिवसात २८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता कोरोनाचा हॉटस्पाट ठरु पाहत आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्या १०८ झाली आहे.
आतापर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यात २६७० चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी २२०६ आरटीपीसीआर तर ४६४ अॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या असून तालुक्यात आयएलआय तसेच सारीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली आहे. एवढया मोठया प्रमाणावर एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असून मांगली हे गाव ३ ऑगस्टपासून १४ दिवसांसाठी कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरातील देलनवाडी परिसरात ३ रुग्ण आढळून आल्याने रुग्ण सापडलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या १०८ वर पोहोचली असून यापैकी ग्रामीण भागातील ८० तर शहरातील २८ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत.
ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव थांबण्याचे नावच घेत नाही. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सगळेच सुरळीत चालू असताना (जुगनाळा) मांगली येथील एका व्यक्तीचा २ ऑगस्टला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील त्या गावातील एकूण कोरोनाबधित रुग्णसंख्या ६ ऑगस्टपर्यंत २० झाली आहे. संबंधित व्यक्तीने वेळीच योग्य ती काळजी घेतली असती तर तालुक्याची स्थिती चांगली असती. परंतु संबंधित व्यक्तीने व्यवस्थित काळजी न घेतल्याने मांगली येथील बधितांची संख्या आतापर्यंत २० वर पोहोचली आहे. ब्रम्हपुरी शहरातीलसुद्धा आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण देलनवाडी, तीन रुग्ण झाशी राणी चौक तर दोन रुग्ण बाहेर जिल्ह्यातील असून शहरातील रुग्णालयात उपचारासाठी आलेले आहेत. ६ ऑगस्टला सापडलेल्या एकूण २८ रुग्णांपैकी १४ रुग्ण तालुक्यातील एकटया मांगली गावातील असून दोन रुग्ण गांगलवाडी येथील आहेत तर आठ रुग्ण ब्रम्हपुरी शहरातील आहेत. तसेच चार रुग्ण संस्थात्मक विलगीकरणातील आहेत.
या परिसरातील आहेत नवे बाधित
शुक्रवारी पुढे आलेल्या बाधितामध्ये १७ नागरिक अॅन्टिजेन चाचणीतून पुढे आले आहेत. यामध्ये एकट्या बल्लारपूर शहरातील १५ लोकांचा समावेश आहे. तर उर्वरित एक जण चुना भट्टी वार्ड राजुरा येथील रहिवासी आहे. अॅन्टिजेन चाचणीत अन्य १७ वा बाधित चंद्रपूर बसस्थानक परिसरात सिद्धार्थ हॉटेलजवळील आहे. या ठिकाणच्या ५४ वर्षीय एका पुरुषाचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नियमित चाचणीद्वारे पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, तर भद्रावती येथील रुग्णांचा समावेश आहे.
चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
चंद्रपूर तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहे. या तालुक्यात गुरुवारपर्यंत २५४ रुग्णांची नोंद आहे. यातील १८१ रुग्ण हे चंद्रपूर मनपा हद्दीतील आहेत तर ७३ रुग्ण हे चंद्रपूर तालुक्यातील आहेत.