जुनी पेंशन योजनेसाठी चंद्रपुरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:03 PM2018-10-31T23:03:31+5:302018-10-31T23:04:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जुनी पेंशन योजना बंद करुन शासनाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरु केल्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुनी पेंशन योजना बंद करुन शासनाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरु केल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षितता नाही. त्यामुळे ही योजना बंद करुन जुनी पेंशन योजना सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन तालुका व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना बंद करुन नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. मात्र ही योजना फसवी व कर्मचारीविरोधी असल्याने जुना पेंशन योजना सुरु करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने वतीने केली आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होती. मात्र शासनाने ३१ आॅक्टोबर २०१५ रोजी नवे परिपत्रक काढून १ नोव्हेंबर २००५ नंतर महाराष्ट्र सरकारच्या सेवेत रूजू होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांची (१९८२-८४) ची जुनी पेंशन बंद करून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. जुनी पेंशन योजनेमध्ये कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर व मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या परिवाराला सुरक्षितता होती. मात्र जुनी पेंशन योजना कर्मचाऱ्यांचे अथवा त्यांच्या कुटुंबियाचे कोणतेही भविष्य नाही. त्यामुळे ही योजना घातक व फसवी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. येथील आझाद बागेत सर्व कर्मचारी जमा झाले. त्यानंतर मोर्चा निघाला. गांधी चौक, जयंत टाकीज चौक, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुषांत निमकर, सचिव निलेश कुमरे, कार्याध्यक्ष प्रशांत खुसपुरे, उपाध्यक्ष अविनाश चवले व योगराज भिवगडे, भालचंद्र धांडे, श्रीकांत पोडे आदी उपस्थित होते.