वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर-गडचिरोलीतच सर्वाधिक बळी 

By राजेश मडावी | Published: May 17, 2023 04:45 PM2023-05-17T16:45:48+5:302023-05-17T16:46:13+5:30

Chandrapur News २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले.

Chandrapur-Gadchiroli has the highest number of victims in wild animal attacks | वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर-गडचिरोलीतच सर्वाधिक बळी 

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर-गडचिरोलीतच सर्वाधिक बळी 

googlenewsNext

राजेश मडावी
चंद्रपूर : राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५० अभयारण्ये व २३ संवर्धन राखीव अशा एकूण ७९ संरक्षित क्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापनात अनेक सुधारणा झाल्या. मात्र, मानव व वन्यजीव संघर्षातून नागरिकांचे बळी जाण्याच्या घटनांची तीव्रता संपली नाही. २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले. आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा शिवारात संचार वाढू लागल्याने यंदाही हा धोका कायम आहे.

राज्याच्या वन विभागाने ‘मानव-वन्यजीव संघर्ष व उपाययोजना’ नावाची एक अधिकृत टिपणी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यूमुखी पडलेल्या २२ जिल्हानिहाय घटनांची नोंद केली. त्यानुसार, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक व्यक्तींचे बळी गेले. २०१९ मध्ये राज्यात ४७ जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूरच्या ४७ बळींचा समावेश होता. २०२०-२१ मध्ये राज्यात ८२ व चंद्रपुरात ३२ व गडचिरोली ९, २०२१-२२ मध्ये राज्यात ८६ तर चंद्रपुरात ४६, गडचिरोली १५ आणि २०२२-२३ मध्ये राज्यात ९० तर चंद्रपुरातील ५१ जणांचा बळी गेला. २०२२-२३ मध्ये बळी गेलेल्या राज्यातील ९० नागरिकांत चंद्रपूरचे ५१ व गडचिरोलीच्या २५ जणांचा समावेश आहे. त्यातही वाघाच्या हल्ल्यात २०२२ मध्ये चंद्रपूर ४५ तर गडचिरोलीत २४ अशा एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघ-बिबट पाहणे पर्यटकांना सुखावणारे असेलही; पण मानव-वन्यजीव संघर्ष अत्यंत टोकदार झाला आहे. 

संघर्षाचे असे केले वर्गीकरण

राज्य वन विभागाने मानव-वन्यजीव संघर्षाचे वन्यप्राण्यांच्या प्रकारानुसार, जिल्ह्यांना वर्गीकृत केले. मानव -वाघ संघर्ष (चंद्रपूर जिल्हा) मानव- इतर मांस भक्षक व तृण भक्षक (संपूर्ण राज्य) व मानव-जंगली हत्ती (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली व गोंदिया) असे  तीन संघर्ष नमुद करून या तिन्ही प्रकारच्या मानव-वन्यजीव संघर्षाला कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत, असा दावा केला आहे.

Web Title: Chandrapur-Gadchiroli has the highest number of victims in wild animal attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ