६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार
By परिमल डोहणे | Published: June 5, 2024 05:38 PM2024-06-05T17:38:51+5:302024-06-05T17:39:50+5:30
Chandrapur : १९५१ पासून १२ महिलांनी लढवली लोकसभा निवडणूक
चंद्रपूर : मंगळवारी लागलेल्या लोकसभेच्या निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख ६० हजार ४०६ मतांनी पराभव करून विधानसभेपाठोपाठ लोकसभेत एन्ट्री केली आहे. लोकसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात दिल्ली गाठणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी १९६४ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. तब्बल ६० वर्षांनंतर प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार चंद्रपूरला मिळाल्या आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर सन १९५१ ला संपूर्ण देशभरात पहिला लोकसभा निवडणूक झाली. तेव्हापासून चंद्रपूर लोकसभेत १२ महिलांनी निवडणूक लढवली आहे. यामध्ये १९६४, १९६७ मध्ये ताई कन्नमवार, १९८९, १९९१ मध्ये ज्येष्ठ गौरी भवसार, १९९६, १९९८ मध्ये सत्यशीला रायपुरे यांनी दोनदा निवडणूक लढवली आहे, तर १९८० मध्ये प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ जयश्री इंगळे, १९८९ उर्मिला पाठक, १९९१ वीरा सिर्गेवार, १९९९ शोभा पोटदुखे, २००४ तायरा शेख, २०२४ मध्ये प्रतिभा धानोरकर, पौर्णिमा घोनमोडे, वनिता राऊत यांनी निवडणुका लढवल्या आहेत. यापैकी १९६४ च्या पोटनिवडणुकीत ताई कन्नमवार, तर २०२४ च्या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांनी विजय मिळविला आहे.
अशी झाली पोटनिवडणूक
१९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लाल शामशहा यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र, त्यांनी २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या जागेवर त्याचवर्षी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ताई कन्नमवार या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्या.
आजपर्यंतचे खासदार
१९५१ मुल्ला अब्दुलभाई ताहेर अली (भाराकाँ)
१९५७ व्ही. एन. स्वामी (भाराकाँ)
१९६२ लाल शामशहाला भगवानशाहा (अपक्ष)
१९६४ ताई कन्नमवार (भाराकाँ) (पोटनिवडणूक)
१९६७ के. एम. कौशिक (अपक्ष)
१९७१ अब्दुल शफी (भाराकाँ)
१९७७ राजे विश्वेश्वरराव (बीएलडी)
१९८० शांताराम पोटदुखे (भाराकाँ)
१९८४ शांताराम पोटदुखे (भाराकाँ)
१९८९ शांताराम पोटदुखे (भाराकाँ)
१९९१ शांताराम पोटदुखे (भाराकाँ)
१९९६ हंसराज अहीर (भाजपा)
१९९८ नरेश पुगलिया (भाराकाँ)
१९९९ नरेश पुगलिया (भाराकाँ)
२००४ हंसराज अहिर (भाजपा)
२००९ हंसराज अहिर (भाजपा)
२०१४ हंसराज अहिर (भाजपा)
२०१९ बाळू धानोरकर (भाराकाँ)
२०२४ प्रतिभा धानोरकर (भाराकाँ)