चंद्रपूर हिरव्या पाण्याचे प्रकरण; मच्छिमारांना अमलनाला तीरावरून हटण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:07 PM2018-09-06T12:07:46+5:302018-09-06T12:08:20+5:30
तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
चंद्रपूर : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. दरम्यान, धरणातील पाणी दूषित होऊ नये, यासाठी तिरावर शेड उभारून बसणाऱ्या मच्छिमारांना तेथून हटविण्याचे आदेश तहसीलदार रवींद्र होळी यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरचे मुख्य वैज्ञानिक जी.के. खडसे व चमूने धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. धरणाच्या तिरावर मासेमारी करणाऱ्यांनी शेड उभारले असल्याचे चमूच्या लक्षात आले.
मासे कापल्यानंतर माश्यांचे आतडे व इतर घाण धरणात टाकण्यात येते. त्यामुळे शेवाळाला पोषण मिळत असून ते झपाट्याने वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. चमूतील सदस्यांच्या सांगण्यावरून राजुराचे तहसीलदार रवींद्र होळी यांनी मासेमाऱ्यांना तेथून हटविण्याचे आदेश दिले आहेत. मासेमाऱ्यांनी इतरत्र शेड उभारण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही केल्या आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत जनावरांना धरणातील पाणी पाजू नये, अशा सूचना तहसीलदारांनी नोकारी (खु.), नोकारी (बु), बैलमपूर, मानोली (खु.) व जामणी येथील ग्रामपंचायतींना दिल्या आहे.
पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज
धरणाच्या वेस्टवेअरवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. धरणाचे पाणी वेस्टवेअरवरून खाली उतरते. त्याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा आनंद उपभोगण्यासाठी पर्यटक पाणी अंगावर घेतात. त्यामुळे त्वचारोग होऊ शकतो. म्हणून पर्यटकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.