चंद्रपूर : बोहल्यावर चढण्यापूर्वी नावरदेवाने केले मतदान, चंद्रपुरात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद
By राजेश भोजेकर | Published: April 19, 2024 11:37 AM2024-04-19T11:37:52+5:302024-04-19T11:38:56+5:30
सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या उमेदवारांचेही मतदान
चंद्रपूर : काही किरकोळ घटना वगळता चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान सुरू आहे. चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथे एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.
तगडा बंदोबस्त
गडचिरोली-चिमूर मतदार संघात येणाऱ्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या शंकरपूर येथील मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला असून खास तामिळनाडूवरून आलेल्या बंदुकधारी २५ पोलिसांचा बंदोबस्त शंकरपूर येथे आहे.
मुनगंटीवार व धानोरकर यांचे मतदान
चंद्रपूर शहरातील सिटी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर वरोरा येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. ब्रह्मपुरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर राजुरा येथे आमदार सुभाष धोटे तर चिमूर येथे आमदार बंटी भांगडीया आणि चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदान केले.