सैनिकी शाळेने दिला चंद्रपूरला देशात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:34+5:30
६ व्या वर्गाची पहिली तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारुपास येईल, असा विश्वास खुद्द लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर यांनी व्यक्त केला आहे. आणि त्यांचा हा विश्वास अल्पावधीतच पूर्ण होईल, असा जिल्हावासीयांना विश्वास आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे चंद्रपूरची सैनिकीशाळा. या शाळेने चंद्रपूर जिल्ह्याला देशात गौरव मिळवून दिला आहे. संपूर्ण देशभरात २६ सैनिकी शाळा आहेत. यापैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये पूर्ण झाली आहे. ६ व्या वर्गाची पहिली तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारुपास येईल, असा विश्वास खुद्द लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर यांनी व्यक्त केला आहे. आणि त्यांचा हा विश्वास अल्पावधीतच पूर्ण होईल, असा जिल्हावासीयांना विश्वास आहे.
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोळकर यांनी सैनिकी स्कूलचा प्रस्ताव मांडला. ही सैनिकी शाळा वर्धा जिल्ह्यात व्हावी, अशी निंभोळकर यांची इच्छा होती. ना. सुधीर मुनगंटीवार यांना हा प्रस्ताव आवडला.
ही सैनिकी शाळा चंद्रपूरला व्हावी व त्याचा सर्व विदर्भवासीयांना फायदा व्हावा, अशी इच्छा मुनगंटीवारांनी दर्शविली. आणि देशातील अत्याधुनिक सैनिकी शाळा चंद्रपुरात उभारण्याच्या वाटचालीला प्रारंभ झाला. चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील १२३ एकरांमधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास आली आहे. ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून केवळ चंद्रपूर नव्हे महाराष्टÑात सैनिकी शिक्षणाचे आणखी एक दालन उघडले गेले आहे. २० जूनपासून या ठिकाणी देशाचे भावी सैनिक घडविणे सुरूही झाले आहे. सैनिकी स्कूलचे प्राचार्य स्क्वाड्रन लीडर नरेश कुमार यांच्या मार्गदर्शनात हे विद्यार्थी सैनिकीचे धडे घेत आहेत. संपूर्ण शाळेवर त्यांचे असलेले नियंत्रण वाखाणण्यासारखे आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्यायवत असे सैनिकी संग्रहालयदेखील आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय आहे. ताडोबाच्या पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचे कॅम्पस बघता येते. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद विरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळेदेखील उभारण्यात आले आहेत. सभागृहामध्ये कारगिल युद्ध, भारताचे राष्टÑपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू या ठिकाणी दर्शनी ठेवण्यात आल्या आहेत. सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे आहे. मैदान हे आॅलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टँकपासून तर सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे असणार आहेत.
सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक व्यवस्था
विद्यार्थ्याना शारीरिक, मानसिक आणि बौध्दिक सक्षम बनविणारे सारे साधनं या शाळेत आहेत. अभ्यासिका व मार्गदर्शक आहेत. घोडेस्वारी, तिरंदाजी, दौड, फुटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण इत्यादी क्रीडा प्रकाराकरिता मैदान आहेत. बौध्दिक मेजवानी घेण्याकरिता विविध प्रकारच्या साहित्याने परिपूर्ण वाचनालय, एकाच वेळेला ८०० विद्यार्थी बसून भोजन करू शकतील, असे भोजनालय, एक हजार बैठक क्षमतेचे सांस्कृतिक भवन, १९० विद्यार्थ्यांकरिता निवास असे सोयीयुक्त अत्याधुनिक व्यवस्थेचे हे सैनिकी शिक्षा केंद्र आहे. कारगिल युध्दाचे प्रत्यख अनुभव घेता यावे, याकरिता तसे मोठे दालन, चंद्रपूर - बल्लारपूर सडक मार्गाच्या दिशेन उंच मनोरा उभा करण्यात आला आहे. त्यावरून चहुबाजूची वनश्री सडके पलिकडील विसापूर, बॉटीनिकल गार्डन बघता येईल.