चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान आयोजन
By साईनाथ कुचनकार | Published: February 7, 2024 06:27 PM2024-02-07T18:27:00+5:302024-02-07T18:27:16+5:30
सिनेरसिकांना मेजवानी, चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (सिफ) उद्घाट्न ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमा आणि या क्षेत्रात काम करणारी मंडळी दर्जेदार आणि गुणसंपन्न आहेत; परंतु जगातील तसेच भारतातील उत्तम चित्रपट चंद्रपूरच्या रसिकांना बघता यावे, यासाठी पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या धर्तीवर चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल (सिफ)चे आयोजन मागील वर्षीपासून करण्यात आले आहे. येत्या ९ फेब्रुवारीपासून दुसरा तीन दिवसीय चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीराज सिनेमा येथे सुरू होत आहे. सिनेरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (सिफ) उद्घाट्न ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत. ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान मीराज सिनेमा येथे होणाऱ्या या महोत्सवाची ‘सिनेमा इज होप’ ही थीम आहे. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. त्यानिमित्ताने नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा, महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
१७ चित्रपटांचे होणार प्रदर्शन
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘वल्ली’ (मराठी, दिग्दर्शक-मनोज शिंदे) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे. महोत्सवात एकूण देश-विदेशांतील १७ चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. हे सर्व चित्रपट इंग्लिश सबटायटलसहित प्रेक्षकांना पाण्याची संधी लाभणार आहे. मागील वर्षीच्या महोत्सवाला चंद्रपूरच्या चित्रपट प्रेमिकांनी दिलेली दाद म्हणूनच यावर्षी देखील उत्तमोत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट खालीलप्रमाणे
वल्ली, ह्युमनिसट व्यंपायर सिकिंग कन्सेंटिंग स्युसायडिकल पर्सन, द फॉक्स, इरत्ता, गुड्बाय ज्युलिया, सिटी ऑफ विंड, द साइरन, लव इज फॉर ऑल, द बर्डेनेड, बिहाइंड द माउंटन्स, आर्ट कॉलेज १९९४, भेरा, सिटीजन सेंट, द बुरीटी फ्लॉवर, डेजर्ट, बहादूर आणि जिप्सी.