"दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय निराशाजनक; मंत्र्याच्या हट्टामुळे दारूबंदी रद्द"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 06:12 PM2021-05-30T18:12:54+5:302021-05-30T18:14:16+5:30
महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सेवाग्राम (वर्धा) : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतली आहे. हा निर्णय निराशाजनक असल्याच्या आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविले आहे.
"दारूबंदीमुळे गुन्हेगारी व अवैध दारूची विक्री वाढते असा जावई शोध चंद्रपूरचे पालकमंत्री यांनी लावला आहे. त्याच पद्धतीचा अहवाल तथाकथित समितीकडून करून आणला. या निर्णयाच्या संदर्भात फेरविचार करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन केले होते. ५८८ ग्रामपंचायतींनी तसे ठराव मंजूरही केले आहेत. जिल्हा परिषदेने एकमताने दारूबंदीसाठी ठराव केला. जिल्ह्यातील विचारवंत व विधायक कार्यकर्ते व विविध संस्था तसेच संघटनांनी संयुक्तपणे दारूबंदीची मागणी केली. याच कारणांनी सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर जिह्यात दारूबंदी लागू झाली," असं त्या पत्रात नमूद केलं आहे.
"पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने महसुलासाठी व एका मंत्र्याचा हट्ट पुरविण्यासाठीच दारूबंदी रद्द केली. ही बाब अयोग्य असून लाखो महिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी असल्याचे पत्रकात नमूद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी आंदोलन झाले. पदयात्रा काढण्यात आल्या. चर्चासत्र झाले. त्या सर्व आंदोलनाचा व लोकभावनांचा हा अपमान आहे. सरकार दारूबंदीच्या अंमलबजावणीत असफल ठरले आहे. त्या अपयशाची परिणती बंदी उठविण्यात आली. त्याबाबत फेरविचार करावा," अशी मागणीही पत्रातून महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, मंत्री मधुकर शिरसाट, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, प्रवक्ता रमेश दाणे यांनी पत्राद्वारे केली आहे.