पोटदुखी, खोकल्याच्या औषधांचीही नशा; तरुणाईचा झिंग झिंग झिंगाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 06:08 PM2021-11-26T18:08:06+5:302021-11-26T18:15:57+5:30
शाळा-काॅलेजात जाणारे अनेक विद्यार्थी खोकल्याच्या तसेच पोटदुखीच्या औषधांचा वापर नशा आणणाऱ्या दारूसारख्या पदार्थांसारखा करायला लागले आहेत.
चंद्रपूर : नशा करण्यासाठी आजची पिढी विविध पर्याय शोधत असल्याचे उघडकीस येत आहे. आता तर नशेसाठी औषधांचासुद्धा वापर केल्याचे समोर येत आहे. मात्र, हा प्रकार आरोग्याला हानीकारक असल्याने पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
समाजामध्ये दारू, गांजा अशा मादक पदार्थांच्या सेवनाचे अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर अनेक युवकांनी नशा करण्यासाठी विविध पर्याय शोधले. आता दारु सुरु झाली असली, तरी अनेकजण नशेसाठी विविध पर्याय शोधत आहेत.
खोकल्याच्या औषधांमध्ये कोडीनसारखी काही घटकद्रव्ये आहेत की, ज्यांच्यामुळे माणसाला नशा चढू शकते. आता ही गोष्ट सर्वांनाच माहीत झालेली आहे. शाळा-काॅलेजात जाणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खोकल्याच्या तसेच पोटदुखीच्या औषधांचा वापर नशा आणणाऱ्या दारूसारख्या पदार्थांसारखा करायला लागल्या आहेत. काही मुले आणि मुली कायम ही औषधे जवळ बाळगायला लागली असून, खोकला असो की नसो पण नित्यनियमाने ही औषधे प्राशन करून गुंगीचा अनुभव घ्यायला लागली आहेत. परंतु, याचे दुष्परिणाम दारुपेक्षा अधिक असल्याने धोकादायक स्थिती आहे. सद्यस्थितीत आपल्याकडे अशा औषधांचा वापर करुन नशा करण्याचे प्रमाण कमी असले, तरी पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
यातून वाढते गुन्हेगारी
दारुबंदीच्या काळापासून जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागे चंद्रपूर पोलिसांनी ड्रग्जसह अनेक शाळकरी मुलांनी ताब्यात घेतले होते. तसेच गांजाची वाहतूक करतानाही पोलिसांनी अटक केली आहे. अशा व्यवसायात अनेकजण गुरफटत आहेत. त्यामुळे पालकांनी सतर्क असणे गरजेचे आहे.
प्रिस्क्रीप्रशनशिवाय औषधे विकायलाच नको
काऊंटर ड्रग्स विक्रीसाठी दुकानदार कोणत्याही प्रकारचे प्रिस्क्रीप्शन मागत नाहीत. त्यामुळे खोकल्याची किंवा पोट दुखण्याची औषधे सहज मिळून जातात. तसेच खोकल्याची किंवा पोट दुखण्याची औषधे घरी सर्वांसमोर पिली तरी कुणीही काहीही बोलत नाही. परंतु, आपला मुलगा जर अशी औषधे नियमित पीत असेल तर पालकांनी त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मेडिकल स्टोअर्सवाल्यांनीसुद्धा अशी औषधे देणे टाळायला हवे.
खिशाला परडवडणारी जीवघेणी नशा
खोकल्याची औषधे किंवा पोटदुखीची औषधे सहज कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होतात. तसेच इतर नशा करण्याच्या पदार्थांपेक्षा ही औषधे स्वस्त असल्याने अनेकजण हा पर्याय निवडतात. कोडिनमुळे नशा तर येते पण तोंडाला वास येत नाही आणि आपण अशी एक नशा करत आहोत, हे कोणालाही कळत नाही. परंतु, कोडीनचे दुष्परिणाम दारूपेक्षासुद्धा वाईट आहेत. त्यामुळे अशा नशेपासून दूरच राहणे योग्य आहे.