चंद्रपूर मेडिकल कॉलेजला मिळाले पाच सहयोगी प्राध्यापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:07 PM2017-09-15T23:07:12+5:302017-09-15T23:07:56+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील व्यवस्थेवर ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरु केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील व्यवस्थेवर ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरु केली होती. याची दखल घेत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवजात शिशूंच्या मृत्यूबाबत व येथील आरोग्य यंत्रणेबाबत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सांवत तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क साधून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. दरम्यान, चंद्रपूरात प्रसुती विभागात अतिरिक्त अतिदक्षता विभागाला मंजुरी मिळाली असून शुक्रवारी सांयकाळी पाच सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश धडकला आहे. तसेच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबीत बांधकामासाठी संबंधित विभागाला कडक आदेश देण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी या संदर्भात सांयकाळी माहिती देताना पाच सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश धडकल्याचे सांगितले. चार दिवसांपूर्वी मुंबईमध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये १५ दिवसांत या ठिकाणच्या रिक्तपदावर डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. या बैठकीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागांकडून हालचाली सुरु झाल्या होत्या. आणखी काही रिक्त जागांवर नवीन आदेश येण्याची अपेक्षा आहे. नव्या नियुक्तीमध्ये स्त्रीरोग शास्त्रविभागामध्ये दोन सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरण विभागात दोन सहयोगी प्राध्यापक तर औषध वैद्यकीय शास्त्र विभागात एका सहयोगी प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सांवत यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रसुती विभागातील नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाढलेल्या रुग्ण संख्येवर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. सोबतच औषधी खरेदीसाठी राज्यस्तरावरुन निधी कमी पडणार नाही. याचे नियोजनही करण्यात आले आहे.
जिल्हा दोन वर्षांत आरोग्याबाबत मॉडेल करणार
प्रस्तुत प्रतिनिधीने ना. मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याबाबतचे गांभिर्य बोलून दाखविले. ना. मुनगंटीवार म्हणाले, रुग्णालयाचा एक मोठा कार्यक्रमच हाती घेतला आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून पुढल्या दोन वर्षांत जिल्हा मॉडेल करायचा आहे. या अनुषंगाने अहवाल तयार करतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशीही याबाबतीत आपली चर्चा झालेली आहे. मेडीकल कॉलेजही दोन वर्षांत बांधून तयार करण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहे. डॉक्टर मिळत नसल्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॉन तयार करण्याची विनंती राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे केलेली असल्याची माहितीही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुविधेत होणार वाढ
वैद्यकीय महाविद्यालयात सद्या एमबीबीएसची तिसरी तुकडी आली असून या वैद्यकीय महाविद्यालयातील तुकडी जशी वाढत जाईल. त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यामध्ये पुढील दोन वर्षात अमूलाग्र बदल होणार आहे. हा प्रत्येक बदल सामान्य माणसाच्या आरोग्याशी संबंधित असून त्याचा उपयोग प्रत्येक रुग्णाला होणार आहे. आदिवासी भागातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अद्यावत वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे असणार असून पूर्ण बांधकामाअंती एक अतिभव्य सुविधापूर्ण रुग्णालय सामान्य जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. कोणत्याही खाजगी दवाखान्यापेक्षा सर्व सुविधा मोफत या ठिकाणी उपलब्ध होणार असून यासाठी राज्याचे वित्त मंत्री प्रत्यक्ष लक्ष ठेवून असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी दिली आहे.
रूग्णांना दिलासा देणारे निर्णय
बांधकाम विभागाला दिला अल्टीमेटम
डॉक्टरांचा मोबाईल लागला भिंतीवर
चंद्रपुरात अतिरिक्त अतिदक्षता विभागाची घोषणा
औषध खरेदीसाठी तत्काळ निधीची उपलब्धता
आकस्मिक पाहणीत थेट कारवाईचे निर्देश
जिल्हाधिकारीही यंत्रणेवर ठेवणार निगराणी