प्रशासन लोकाभिमुख करण्यास चंद्रपूर मनपा कटिबद्ध - पालिवाल
By राजेश मडावी | Published: October 26, 2023 04:10 PM2023-10-26T16:10:07+5:302023-10-26T16:11:33+5:30
विपीन पालिवाल : स्थापना दिन उत्साहात, मनपाच्या विविध सेवांचा शुभारंभ
चंद्रपूर : महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून विविध लोकोपयोगी कामे व अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. विकासकामांची ही मालिका पुढेही सुरू राहणार असून, प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आयुक्त विपीन पालीवाल यांनी मनपा स्थापना दिन सोहळ्यात दिली.
चंद्रपूर मनपाच्या स्थापना दिनानिमित्त नमो शहर सौंदर्यीकरण अभियानांतर्गत संस्कार स्वच्छतेचा मंत्र आरोग्याचा या अभियानाची सुरुवात राजीव गांधी उद्यान पठाणपुरातून झाली. या परिसरातील एक झेंडी (अनधिकृत कचरा टाकण्याचे ठिकाण) पूर्णपणे बंद करण्यात आली. चंद्रपूर शहर झेंडीमुक्त करण्यात येणार आहे. उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सकाळी ९ वाजता गजानन महाराज उद्यान वडगावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आला. १५० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड झाली. याप्रसंगी माजी नगरसेविका सुनीता लोढिया, माजी नगरसेवक देवानंद वाढई व नागरिक उपस्थित होते. मनपा सभागृहातील कार्यक्रमात मनपाच्या विविध सेवांचा शुभारंभ करण्यात आला. सहज वापरण्याजोगी मनपाची नवीन वेबसाइट,ऑल इन वन ॲप तसेच चंद्रपूर सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन नावाचे व्हॉट्सॲप चॅनलसू सुरू करण्यात आले. या चॅनलद्वारे नागरिकांना मनपाच्या बातम्या, योजना, उपक्रमांची माहिती मिळणार आहे. संस्कार स्वच्छतेचा मंत्र आरोग्य अभियानाच्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता अनिल घुमडे, सहायक संचालक नगररचना सुनील दहीकर, लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, उपअभियंता विजय बोरीकर, रवींद्र हजारे, डॉ. वनिता गर्गेलवार रवींद्र कळंबे, डॉ. अमोल शेळके, नागेश नीत उपस्थित होते.
३ हजार ९२० विद्यार्थ्यांची मोफत तपासणी
मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी व सिकलसेल चाचणी शिबिर अभियानाची सुरुवात स्थापना दिनी झाली. येत्या काही दिवसांत मनपाच्या २७ शाळांच्या ३ हजार ९२० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी व सिकलसेल चाचणी होणार आहे. याप्रसंगी २०११ ते २०२३ या कालावधीत केलेल्या विकासकामांची चित्रफितही उपस्थितांना दाखविण्यात आली.