स्वच्छतेच्या ‘थ्री स्टार’वरून चंद्रपूर महापालिकेत आता ‘स्टार’ संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 03:51 PM2021-12-09T15:51:21+5:302021-12-09T16:33:51+5:30
स्वच्छता सर्वेक्षणात महानगर पालिकेला देशात ‘थ्री स्टार’ मिळाले. यावरून मनपा व स्थानिक आमदारांमध्ये ‘स्टार’श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये एका नगरसेवकानेही उडी घेऊन रंगतच आणली आहे.
चंद्रपूर : महापालिकेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर असल्याची चर्चा आहे. हे गृहीत धरून आतापासून चंद्रपूर महानगरातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. स्वच्छता सर्वेक्षणात महानगर पालिकेला देशात ‘थ्री स्टार’ मिळाले. यावरून मनपा व स्थानिक आमदारांमध्ये ‘स्टार’श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये एका नगरसेवकानेही उडी घेऊन रंगतच आणली आहे.
महानगरपालिकेला स्वच्छता सर्वेक्षणात तीन स्टार मिळाले. याच स्टारवरून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार अध्यक्ष असलेल्या यंग चांदा बिग्रेड आणि महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रसिद्धीपत्रक ‘वार’ सुरू झाले आहे. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, गुरुवारी महापालिकेतील भ्रष्टाचार आणि कामगारांना अतिरिक्त १० हजार द्यावे, यासाठी यंग चांदा ब्रिगेड महापालिकेसमोर ‘फाईव्ह स्टार’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे आमदारांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे पुरावे द्यावेत, त्यांचा ९ डिसेंबरला गांधी चौकात ‘सेव्हन स्टार’ देऊन सत्कार करू, असे मनपातील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच अपक्ष नगरसवेक पप्पू देशमुख यांनीही यात उडी घेतली असून, स्वच्छता कर्मचारी ‘सुपरस्टार’, महापौर आणि आयुक्त ‘फ्लाॅप स्टार’ असल्याचा आरोप करून राजकीय रंग दिला आहे.
महापौर आणि आयुक्त ‘फ्लाॅप स्टार’ : देशमुख
स्वच्छता कर्मचारी व कामगारांच्या मेहनतीला महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वाची जोड मिळालेली नाही. त्यांचे लक्ष घोटाळे करून पैसे कमावण्यात तसेच घोटाळेबाजांना संरक्षण देण्यामध्ये लागले असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.
आमदार स्वत:ला सुपरस्टार सिद्ध करण्याच्या नादात - सत्ताधारी
स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर गालबोट लावून प्रसिद्धीसाठी आंदोलनाचे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे मनपाच्या कामावर घोटाळ्याच्या आरोप लावताना आधी आपल्या ‘दिव्याखालचा अंधार’ बघा आणि मगच दुसऱ्याला ‘फाईव्ह स्टार’ देण्याची भाषा करा, असे प्रतिउत्तर भाजपच्या मनपा पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी स्थानिक आमदार स्वतःला सुपरस्टार सिद्ध करण्यास लागल्याचेही पत्रकात म्हटले आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांना उपरोधिक फाईव्ह स्टार देऊन स्वतःची फजिती करून घेण्यापेक्षा आमदारानी निवडणूक काळात दिलेले आश्वासन बघावे. त्यातील किती पूर्ण झाले, त्याची यादी जाहीर करावी, असेही म्हटले आहे.
होर्डिंग्जवर खर्च कशाला? कर्मचाऱ्यांना द्या - यंग चांदा ब्रिगेड
अत्यल्प वेतन व अपुऱ्या संसाधनातही चंद्रपुरचे भूमिपुत्र सफाई कर्मचारी उत्तम सेवा देत असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. त्यांच्या मागण्या मनपातील भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित ठेवल्या आहेत. याच कर्मचाऱ्यांच्या श्रमामुळे मनपाला स्वच्छता सर्वेक्षणातील तीन स्टार मिळाले आहेत. यावर खर्च टाळून ही रक्कम पुरस्काराचे खरे मानकरी सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकायला हवे होती, अशी टीका करून यंग चांदा ब्रिगेडने घोटाळेबाजांना आंदोलनातून पाच स्टार नामांकन देणार असेही म्हटले आहे.